बाहुबलीनंतर आता रुद्र! 'वाराणसी'चा टीझर रिलीज; प्रियंका चोप्राचा खास अभिनय, कथा, रिलीज डेट काय? वाचा
Varanasi Teaser Out how movie is when it will released : 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि सुपरस्टार महेश बाबू यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'वाराणसी' चा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी हैदराबादमधील एका भव्य सोहळ्यात या चित्रपटाचे शीर्षक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले.

या इव्हेंटमध्ये महेश बाबू यांनी एका बैलगाडीवर स्वार होऊन खास शैलीत एन्ट्री घेतली. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांचीही उपस्थिती होती. टीझरसोबतच महेश बाबू यांचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, ज्यात ते कुर्ता-पायजमा परिधान करून, हातात त्रिशूल घेऊन 'रुद्र'च्या अत्यंत प्रभावी अवतारात दिसत आहेत.
'वाराणसी'ची कहाणी: प्राचीन युगापासून अंटार्क्टिकापर्यंतचा कॅनव्हास
राजामौली यांनी नेहमीप्रमाणेच चित्रपटाच्या कथेचा कॅनव्हास खूप मोठा ठेवला आहे, जो त्यांच्या मागील 'मास्टरपीस' चित्रपटांची आठवण करून देतो. टीझरची सुरुवात 512 CE मधील प्राचीन वाराणसी शहरापासून होते. त्यानंतर प्रेक्षकांना अंटार्कटिका, आफ्रिकेचे जंगल, तसेच हनुमानजी आणि श्रीराम यांच्या वानरसेनेचा रावणाशी झालेल्या युद्धासारखी भव्य दृश्ये पाहायला मिळतात. कथेचा प्रवास पुन्हा वाराणसीमध्ये परत येतो, जिथे महेश बाबूंचा शक्तिशाली लूक समोर येतो. या व्हिज्युअल्समुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, चाहत्यांनी याला 'अवतारचा बाप' आणि 'राजामौलींचा पुढील मास्टरपीस' असे म्हटले आहे.
प्रियंका चोप्राचा दमदार ॲक्शन लूक
या चित्रपटात बॉलिवूड आणि हॉलिवूडची स्टार अभिनेत्री प्रियंका चोप्रा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात त्या 'मंदाकिनी' हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणार आहेत. फर्स्ट लुकमध्ये प्रियंका चोप्रा साडी नेसून हातात बंदूक घेऊन ॲक्शन करताना दिसत आहेत. त्यांचा हा दमदार अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. साऊथचे प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'मास्टरपीस'ची रिलीज तारीख
एस. एस. राजामौली दिग्दर्शित हा बिग-बजेट चित्रपट २०२७ च्या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या टीझर रिलीजमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications