‘द केरळ स्टोरी-2' वरून सिनेसृष्टीत ठिणगी; दिग्दर्शक कामाख्या सिंह यांचा अनुराग कश्यपवर बोचरी टीका
The Kerala Story 2 Controversy : चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची परंपरा 'द केरळ स्टोरी'च्या दुसऱ्या भागानेही कायम ठेवली आहे. 'द केरळ स्टोरी २' चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यात आता शाब्दिक युद्ध रंगलं आहे. चित्रपटातील एका विशिष्ट दृश्यावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला असून, सिनेसृष्टी दोन गटांत विभागली गेल्याचे चित्र दिसत आहे.

वादाचे मुख्य कारण: तो 'बीफ' सीन
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यात एक मुस्लिम कुटुंब अभिनेत्रीला जबरदस्तीने गोमांस (बीफ) खाऊ घालत असल्याचे दिसते. या दृश्यावर अनुराग कश्यप यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. "कोणीही कोणाला अशा प्रकारे गोमांस काय, साधी खिचडीही जबरदस्ती खाऊ घालू शकत नाही," असे म्हणत कश्यप यांनी या चित्रपटाला 'प्रोपांडा' आणि 'निरर्थक' ठरवले होते.
#WATCH | Delhi: On Anurag Kashyap’s statement on 'Kerala Story 2,' movie director Kamakhya Narayan Singh says, "... The audience does not take him seriously. His films have been flopping for many years. He became mentally weak. He is not able to see the truth that our sisters are… pic.twitter.com/pFAuzo28vn
— ANI (@ANI) February 23, 2026
अनुराग कश्यप मानसिकदृष्ट्या दुर्बळ; सिंह यांचा पलटवार
अनुराग कश्यप यांच्या टिकेला उत्तर देताना दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी कश्यप यांच्यावर खालीलप्रमाणे गंभीर आरोप केले आहेत:
मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह : "अनुराग कश्यप आता मानसिकदृष्ट्या दुर्बळ झाले आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीची तक्रार असते-मग ती चित्रपटसृष्टी असो, ब्राह्मण समाज असो किंवा नेटफ्लिक्स," असे सिंह यांनी म्हटले.
जुना संदर्भ : कामाख्या यांनी कश्यप यांच्या 'द गर्ल इन येलो बूट्स' चित्रपटाचा दाखला देत, त्यातील वडील-मुलीच्या नात्याच्या चित्रणावर सडकून टीका केली.
वास्तवाचा दावा : समाजात निष्पाप मुलींचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना गोमांस खायला लावण्याचे प्रकार घडतात आणि हा गंभीर गुन्हा आहे, असा दावा सिंह यांनी केला आहे.
फ्लॉप चित्रपटांचा टोला
कामाख्या नारायण सिंह यांनी अनुराग कश्यप यांच्या व्यावसायिक यशावरही बोट ठेवले. "कश्यप यांचे चित्रपट गेल्या काही काळापासून सातत्याने फ्लॉप होत आहेत, त्यांनी आता थोडी अक्कल वापरावी," असा टोला त्यांनी लगावला. 'द केरळ स्टोरी २' हा पूर्णपणे तथ्यांवर आधारित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
प्रदर्शनापूर्वीच वातावरण तापले!
दुसरीकडे, अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट समाजातील सलोखा आणि एकतेला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 27 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि चित्रपट निर्मात्यांमधील हा वाद पाहता, बॉक्स ऑफिसवर याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रेक्षक याकडे 'वास्तव' म्हणून पाहतात की 'विवाद' म्हणून, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications