थलापती विजयचा चेन्नई विमानतळावर अपघात; चाहत्यांच्या गर्दीत सुपरस्टारचा तोल गेला; नेमकं काय घडलं?
Thalapathy Vijay Chennai Airport Accident : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा 'थलापती' आणि 'तमिलगा वेत्री कझगम' (TVK) पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्याबाबत चेन्नई विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला, ज्यामध्ये विजय यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले.

विमानतळावर नक्की काय घडले?
थलापती विजय हे त्यांच्या आगामी 'जन नायकन' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच सोहळ्यासाठी मलेशियातील क्वालालंपूर येथे गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते चेन्नई विमानतळावर परतले. विजय विमानतळाच्या बाहेर पडणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो चाहत्यांनी एक्झिट गेटवर गर्दी केली.
VIDEO | TVK chief Vijay stumbled and fell while trying to get into his car at the Chennai airport.
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2025
A large crowd of fans gathered to welcome him as he returned from Malaysia.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/x42Kpd0AsW
जसे विजय बाहेर येताच चाहत्यांचा उत्साह अनावर झाला. प्रत्येकाला आपल्या लाडक्या अभिनेत्याला जवळून पाहायचे होते. याच रेटारेटीमध्ये विजय यांचा तोल गेला आणि त्यांच्या कारपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते खाली पडले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरक्षा रक्षकांची तत्परता
सुदैवाने, विजय यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि विमानतळ सुरक्षा दलाने तातडीने परिस्थिती हाताळली. त्यांनी कडे करून विजय यांना सावरले आणि सुरक्षितपणे त्यांच्या गाडीत बसवले. या झटापटीत विजय यांच्या ताफ्यातील एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, सुदैवाची गोष्ट म्हणजे विजय यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुरक्षितपणे आपल्या निवासस्थानी रवाना झाले.
'जन नायकन': कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट?
चाहत्यांच्या या अभूतपूर्व गर्दीमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे विजय यांची राजकीय घोषणा. 'जन नायकन' हा विजय यांच्या सिने-कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याचे मानले जात आहे. चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहेत, त्यामुळेच चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक भेटीबद्दल प्रचंड ओढ दिसत आहे.
"माझ्या चाहत्यांसाठी मी सिनेमा सोडतोय"
मलेशियातील ऑडिओ लाँच कार्यक्रमात विजय यांनी उपस्थितांशी संवाद साधताना अत्यंत भावूक विधान केले. ते म्हणाले, "जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हा मला वाटले की मी वाळूचे एक छोटे घर बांधत आहे. पण तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासाठी एक मोठा किल्ला (कोट्टई) उभा केला.
आता वेळ आली आहे की, ज्या चाहत्यांनी मला इतके प्रेम दिले, त्यांच्यासाठी मी काहीतरी करावे. म्हणूनच मी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे." विजय यांच्या या विधानामुळे ते आता तमिलगा वेत्री कझगम (TVK) च्या माध्यमातून तामिळनाडूच्या राजकारणात मोठी झेप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications