स्मृती मानधनासोबतचं नातं व 'बेवफाई'चे आरोप; पलाश मुच्छल आक्रमक, या व्यक्तीवर मानहानीचा ठोकला खटला
Palash Muchhal Defamation Case : भारतीय महिला क्रिकेटची स्टार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्यातील तुटलेल्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मात्र, आता या वादाने कायदेशीर वळण घेतले आहे. पलाश मुच्छल यांनी अभिनेता-निर्माता विद्यान माने यांच्यावर १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला असून, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

लग्नाआधीच मोडलं नातं: नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाच्या बातम्यांनी मीडिया व्यापून गेला होता. हळदी, मेहंदी आणि संगीत असे सर्व विधी थाटामाटात पार पडले होते.
मात्र, लग्नाच्या अगदी उंबरठ्यावर असताना हे नाते अचानक तुटले. या घटनेनंतर पलाशच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आणि सोशल मीडियावर त्याच्या कथित 'बेवफाई'च्या चर्चांना उधाण आले.
विद्यान माने यांचे खळबळजनक आरोप
या संपूर्ण प्रकरणात स्मृती मानधनाचा जुना मित्र विद्यान माने याने केलेल्या विधानामुळे आगीत तेल ओतले गेले. माने यांनी पलाशवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले होते.
रंगेहाथ पकडल्याचा दावा : लग्नाच्या दिवशी पलाशला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले, असा दावा माने यांनी केला.
मारहाणीचा आरोप : तिथे उपस्थित असलेल्या महिला क्रिकेटपटूंनी रागाच्या भरात पलाशला मारहाण केली, असेही माने यांनी सार्वजनिकरीत्या सांगितले.
कुटुंबाबद्दल अपशब्द : याशिवाय माने यांनी पलाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अपमानास्पद भाषा वापरली होती.
पलाश मुच्छल यांचे कायदेशीर प्रत्युत्तर
विद्यान माने यांनी केलेले सर्व आरोप पलाशने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. "ही विधाने केवळ खोटी नसून माझी आणि माझ्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा आणि करिअर उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने केली गेली आहेत," असे पलाशने स्पष्ट केले आहे.
१० कोटींची नोटीस
पलाश मुच्छल यांनी त्यांचे वकील श्रेयांश मितारे यांच्यामार्फत विद्यान माने यांना १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पलाशने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या कारवाईची माहिती चाहत्यांना दिली.
माफी की न्यायालयीन लढाई?
पलाशने आपल्या भूमिकेत स्पष्ट केले आहे की, जर विद्यान माने यांनी त्यांच्या विधानाबद्दल जाहीरपणे माफी मागितली नाही, तर ते ही कायदेशीर लढाई शेवटपर्यंत लढतील. खोट्या आरोपांमुळे प्रतिमेचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कायदेशीर मार्गानेच केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications