वानखेडे स्टेडिअम, स्मोकिंग, सिंगर ते सलमानशी नडला; वाढदिवसानिमित्त किंग खानच्या जीवनातील काही वाद
Shah Rukh Khan Birthday Special: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. यशाची अनेक शिखरं गाठलेल्या या अभिनेत्याने त्याचं स्वतःचं असं एक स्थान तयार केलं आहे. शाहरुख जे पडद्यावर करतो ते लोकांना पटवून देण्याचं कसब त्याच्या अंगी आहे. त्यामुळेच त्याला किंग खान म्हटलं जातं.पण त्याचा इथवर झालेला प्रवास सोपा नाही. त्यासाठी त्याची प्रचंड मेहनत आणि त्याचं काम करत राहण्यातलं सातत्य हे गुण घेण्यासारखे आहेत. दरम्यान त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग वादग्रस्त ठरले आहेत. चला तर जाणून घेऊया शाहरुख खान यांच्या जीवनातीलग गाजलेले वाद.
'माया मेमसाबच्या पोस्टर'चा वाद
शाहरुख खानच्या करिअरला सुरुवात झाली ती 1992 मध्ये तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकला. दिवाना या सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. याच दरम्यान त्याचा आणखी एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाचं नाव होतं 'माया मेमसाब' केतन मेहता दिग्दर्शित या सिनेमात फारुख शेख, दीपा साही आणि शाहरुख होता. या सिनेमात दीपा साही आणि शाहरुख यांचा बोल्ड लव्ह सीन होता. याच लव्ह सीनचं पोस्टर एका मॅगझीनने छापलं होतं तसंच शाहरुखविषयी गॉसिपही छापलं होतंच. शाहरुखने ते मॅगझीन पाहिलं आणि तो प्रचंड चिडला. त्याने मॅगझीनच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर या साप्ताहिकाच्या संपादकाने शाहरुख खानच्या विरोधात पोलीस तक्रार केली. त्यामुळे शाहरुख खानला एक दिवस जेलमध्ये राहावे लागले.

मोबदला न दिल्याचा गायकाचा वाद
'ओम शांती ओम' हा शाहरुखच्या हिट सिनेमांपैकी एक. या सिनेमासाठी शाहरुख खानने 8 पॅक अॅब्स बनवले होते. या सिनेमात शाहरुखसाठी गायक अभिजितने पार्श्वगायन केलं होतं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिजितने शाहरुख खानवर हा आरोप केला होता की सिनेमात चांगली गाणी गाऊनही शाहरुखने योग्य मोबदला दिला नाही. यावर शाहरुख म्हटला होता की, ज्यांच्याबरोबर कामही करत नाही असेही लोक प्रसिद्ध होतात. त्यानंतर या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता.

कतरिनावरुन सलमानला नडला शाहरुख
शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांचं भांडण माध्यमांमध्ये बरंच गाजलं होतं. कतरिना कैफ वरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बाचाबाची आणि हाणामारीही झाली अशाही बातम्या आल्या होत्या. या दोघांमध्ये वाद इतका विकोपाला गेला होता की दोघं एकमेकांचं तोंडही पाहात नव्हते. अखेर काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या रमजान पार्टीत दोघं एकत्र आले. त्यानंतर या दोघांचा वाद मिटला. मात्र या दोघांची दोस्ती जशी चर्चेत राहिली तसाच यांच्यातला वादही चर्चेला गेला अन् तो आजही चर्चीला जातो.
वानखेडे स्टेडिअमशी वाद
आयपीएल सुरु झालं तेव्हाच शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स ही टीम विकत घेतली होती. 2012 मध्ये केकेआर जिंकल्याचा जल्लोष सुरु झाला. सगळेजण मैदानावर जाऊ लागले. शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि काही मित्र यांच्यासह वानखेडे स्टेडियमध्ये जाऊ लागला तेव्हा विकास दळवी नावाच्या गार्डने शाहरुखला हटकलं. त्यानंतर दळवी आणि शाहरुख यांच्यात बाचाबाची झाली. शाहरुखने आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विकास दळवीने त्याला आता जाण्यापासून रोखलं. या दोघांचा वाद झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लोकही तिथे पोहचले. त्यांच्याशीही शाहरुखने हुज्जत घातली. त्यावेळी मुंबईचे एसएसपी असलेल्या इक्बाल शेख यांनी अखेर शाहरुखला बाहेर नेलं. सगळा प्रकार कॅमेरे सुरु असताना घडला. वृत्तवाहिन्यांनी दिवसभर ही बातमी चालवली आणि दुसऱ्यादिवशी शाहरुखचा मराठी गार्ड बरोबरचा वाद घालतानाचा फोटोही छापून आला.
मुलासाठी झोनल ऑफिसरकडे विनवणी
आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या स्टारडमची पर्वा न करता शाहरुखने आपल्या मुलाच्या सुटकेसाठी झोनल ऑफिसरकडे विनवणी करण्यास सुरुवात केली. मात्र, एक काळ असा होता जेव्हा शाहरुख स्वतःला चांगला पिता मानत नव्हता. पण आर्यनला वाचवण्यासाठी जीवाच रान केलं.
चेन स्मोकिंगमुळे शाहरुख विरोधात तक्रार
शाहरुख खानला धूम्रपानाची सवय आहे. त्याला अनेकदा सिगारेट ओढताना स्पॉट केलं गेलं आहे. मात्र जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियममध्ये जेव्हा शाहरुख सिगारेट ओढत होता त्यावेळी त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती. स्टार स्क्रिन अवॉर्ड्सचा शो होणार होता. त्या दरम्यान शाहरुख खान सिगारेट ओढत असल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

शाहरुख खान आणि आमिर खान वाद
शाहरुख खान आणि आमिर खान या दोघांनी एकमेकांसह आत्तापर्यंत एकदाही काम केलं नाही. शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र आले. आमिर आणि सलमान एकत्र आले पण शाहरुख आणि आमिर यांची जोडी कधीही सिनेमात दिसली नाही. तरीही आमिर खानने शाहरुख बाबत एक ब्लॉग लिहिला होता ज्यामुळे या दोघांमध्ये 'ब्लॉग वॉर' रंगलं. या ब्लॉगमध्ये "मी माझ्या फार्म हाऊसवर असलेल्या झाडाखाली बसलो आहे. समुद्र सपाटीपासून हे ठिकाण 5 हजार फूट उंचीवरचं आहे. इरा, जुनैद आणि अम्मीही माझ्या बरोबर आहेत. शाहरुख माझे तळवे चाटतो आहे. मी त्याला मधून मधून बिस्किट खाऊ घालतो आहे. आता मला अजून काय हवं?" या आशयाचा ब्लॉग आमिर खानने लिहिला होता. ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. त्यावर शाहरुख खानने देखील प्रतिक्रिया दिली.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून बाहेर काढले
ऑक्टोबर 2021 या महिन्यात आर्यन खानला म्हणजेच शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB ने अटक केली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. त्याच्याकडे 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आढळून आल्याचं समोर आलं होतं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. आर्यन खानचा मोबाइलही जप्त करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाचा राजकीय मुद्दा झाला. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे अशा आरोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या. त्यानंतर 27 ऑक्टोबरला शाहरुख खान मुलासाठी जामीन मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र हे प्रकरण माध्यमांमध्ये चांगलंच गाजलं होतं.
लतादीदींचे दर्शन अन् शाहरुखचा वाद
भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर शाहरुख खान त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचला. त्यावेळी शाहरुख खानने त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून 'दुवा' मागितली. मात्र शाहरुखच्या या कृतीवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवाला हात लावून अभिवादन केलं. त्यानंतर दुवा मागत हातावर फुंकर घातली. इस्लाममध्ये ही पद्धत आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दुवा मागितली जाते. त्यानंतर हातावर फुंकर घातली जाते कारण आपणही त्या वाटेने म्हणजेच मृत्यूच्या वाटेने कधी ना कधी तरी जाणार आहोत. दुवा मागण्यात आणि फुंकर घालण्यात काहीही गैर नाही. मात्र 'शाहरुख खान थुंकला' असा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे शाहरुख त्याच्या या कृतीवरुन चांगलाच ट्रोल झाला. मात्र त्याने या प्रकरणात होणाऱ्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही अन् टीकेचा प्रचारही केला नाही.












Click it and Unblock the Notifications