संजय कपूर थर्ड क्लास माणूस, करिश्माचे वडील रणधीर कपूर यांच धक्कादायक विधान
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह केला होता. लग्नानंतर करिश्माने चित्रपटसृष्टीपासून काहीसा दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, कारण ती संपूर्ण वेळ तिच्या नव्या कुटुंबाला देऊ इच्छित होती.

करिश्मा कपूरचं दुःखद वैवाहिक जीवन
करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केलं खरं, पण तिचं वैवाहिक आयुष्य वेदनादायी ठरलं. असे म्हटले जाते की, करिश्माला तिच्या पती संजयची खरी ओळख सुहागरातच समजली होती. त्याच रात्री संजयने करिश्माला खूप अपमानास्पद बोलले होते.
करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं
तरीदेखील करिश्माने संजयसोबत संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. तिला वाटलं की, मुलं झाल्यावर कदाचित नात्यात सुधारणा होईल. दोघांना एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान आहे.
2010 मध्ये करिश्मा मुंबईत परतली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाईट वागणुकीमुळे करिश्मा खूपच त्रस्त झाली होती. शेवटी 2010 मध्ये तिने दिल्लीतील पतीचे घर सोडले आणि पुन्हा मुंबईत आपल्या कुटुंबाजवळ परतली.
एकमेकांवर गंभीर आरोप
2010 पासून करिश्मा आणि संजय वेगळे राहू लागले. करिश्माने संजयवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. तिचं म्हणणं होतं की संजय आणि त्याचं कुटुंब तिच्यावर मारहाण करत असे आणि वाईट वागणूक देत असे. दुसरीकडे, संजय कपूरने करिश्मावर पैशांसाठी लग्न केलं असा आरोप केला होता. त्याचं म्हणणं होतं की करिश्मा या नात्याशी भावनिकदृष्ट्या कधीच जोडलेली नव्हती.
2016 मध्ये घटस्फोट
या कडव्या आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर 2016 मध्ये दोघांचा तलाक झाला. संजय कपूरसाठी हा तलाक सोपा नव्हता. त्यांना करिश्मा कपूरला मोठी एलिमनी (घटस्फोट नंतरची भरपाई) द्यावी लागली. तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाचा सर्व खर्च उचलावा लागला.
अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा तुटला होता
संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्माचा अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला होता. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माची आई बबिता यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्या अभिषेकच्या फिल्मी करिअर आणि कमाईबाबत समाधानी नव्हत्या, कारण त्यावेळी करिश्मा एक यशस्वी आणि कमाई करणारी अभिनेत्री होती.
रणधीर कपूर यांचं सनसनाटी विधान
अभिषेकसोबत साखरपुडा तुटल्यानंतर एक वर्षातच 2003 मध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं लग्न झालं. अनेकांचं म्हणणं होतं की करिश्माने जाणीवपूर्वक लवकर लग्न केलं, जेणेकरून अभिषेकला दाखवता येईल.
2016 मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी आपल्या माजी जावयावर मोठे आरोप केले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होत की,
"संजय हा थर्ड क्लास माणूस आहे. सगळ्यांना आमची प्रतिष्ठा माहीत आहे. आम्ही कपूर आहोत. आम्हाला कोणाच्या पैशांमागे धावण्याची गरज नाही. आम्हाला पैसा आणि कलागुण दोन्हीचा आशीर्वाद लाभलेला आहे."
ते पुढे म्हणाले की,
"मी कधीच या लग्नाला मान्यता दिली नव्हती. पण जे नशिबात असतं, ते टाळता येत नाही. संजय कधीही चांगला नवरा नव्हता. त्याने माझ्या मुलीची काळजी घेतली नाही. तो नेहमी तिची फसवणूक करत होता आणि दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवत होता. संपूर्ण दिल्लीला माहीत आहे की तो कसा आहे. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं."
करिश्मा कपूरला मिळालेली एलिमनी
तलाकवेळी संजय कपूरने करिश्माला 70 कोटी रुपये एलिमनी म्हणून दिले. तसेच आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर 14 कोटींचे बॉण्ड खरेदी करून दिले. त्यांनी आपल्या वडिलांचं घरदेखील करिश्माच्या नावावर केलं. इतकंच नव्हे तर दरमहा 10 लाख रुपये करिश्माला भत्त्याच्या स्वरूपात देत होते. मुलांच्या शिक्षण व इतर खर्चासाठी ते नियमितपणे पैसे पाठवत असत.
घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं, तर करिश्मा कपूर सध्या सिंगल मदर म्हणून आपल्या दोन्ही मुलांसह आलिशान जीवनशैली जगत आहे.
12 जून 2025 संजय कपूर यांचं निधन
संजय कपूर यांचं निधन 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना झालं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी चुकून एका मधमाशीला गिळलं आणि त्या डंखामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.












Click it and Unblock the Notifications