कोणी मिटवला अक्षय कुमार आणि परेश रावलमधील वाद? जाणून घ्या नेमकं काय घडलं?
'हेरा फेरी 3' या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटात परेश रावल पुन्हा सामील झाले असून याआधी त्यांनी हा प्रोजेक्ट सोडल्याचं स्पष्ट केलं होतं. यामुळे अक्षय कुमार नाराज झाला होता आणि त्याने यावर कायदेशीर पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या चित्रपटावर अनिश्चिततेचे ढग जमले होते. मात्र आता अचानक परेश रावलने स्वतःच चित्रपटात पुनरागमनाची पुष्टी केली असून हे सगळं नेमकं कसं घडलं याची माहितीही समोर आली आहे.

वाद मिटवण्यात साजिद नाडियाडवाला आणि अहमद खान यांचा मोठा वाटा
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान यांनी अक्षय आणि परेश यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या गोष्टीची पुष्टी साजिद यांचे भाऊ आणि चित्रपटाचे मूळ निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी केली.
फिरोज नाडियाडवाला म्हणाले, "माझ्या भावाला साजिदला या वादात समेट घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने अनेक दिवस या कामासाठी दिले. आमचं एकमेकांशी पन्नास वर्षांहून अधिक जुनं नातं आहे. अहमद खाननेही त्याच्या पातळीवर प्रयत्न केले.
या दोघांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे आणि परिपक्व दृष्टिकोनामुळेच टीम पुन्हा एकत्र आली. अक्षय कुमार यांचाही आम्हाला उत्तम पाठिंबा लाभला. 1996 पासून आमचं त्यांच्याशी स्नेह आहे. वादाच्या काळातही त्यांनी अत्यंत समजूतदारपणे वागणूक दिली. प्रियदर्शन, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनीही खूप सकारात्मक भूमिका घेतली."
परेश रावल काय म्हणाले?
परेश रावल एका पॉडकास्टमध्ये हिमांशू मेहता यांच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना 'हेरा फेरी 3' संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "खरं सांगायचं झालं तर काहीच वाद नव्हता. मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट लोकांना एवढी आवडते, तेव्हा त्या प्रेक्षकांप्रती आपली जबाबदारी वाढते.
आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घेतली पाहिजे. प्रेक्षकांनी आपल्यावर इतकं प्रेम केलं आहे, की त्यांना हलकंफुलकं कंटेंट देणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मेहनत केली पाहिजे. आधीच चित्रपट यायचा होता, पण आम्ही स्वतःला अजून चांगलं बनवायचं ठरवलं. प्रियदर्शन, अक्षय किंवा सुनील -हे सगळे खूपच क्रिएटिव्ह आहेत आणि माझे जुने मित्रही आहेत."
आता प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या
हेरा फेरी 3 च्या निर्मितीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी मूळ तिघे कलाकार बाबूराव (परेश रावल), राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) पुन्हा एकत्र आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या त्रिकुटाने भारतीय कॉमेडी सिनेमाला जी ओळख दिली, त्याचा पुढचा भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. आता सर्वांच्या नजरा 'हेरा फेरी 3' च्या शूटिंग आणि अधिकृत घोषणेवर लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications