धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या- 'त्या' अफवांवर विश्वास..

Hema Malini on Dharmendra : भारतीय चित्रपटसृष्टीचे 'ही-मॅन' दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील एका सुवर्ण युगाचा अंत झाला. पतीच्या निधनानंतर प्रदीर्घ मौन बाळगलेल्या अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी आता पहिल्यांदाच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. "धरमजींच्या जाण्याचा धक्का पचवणे अशक्य होते," अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

Hema Malini

"आम्हाला वाटलं होतं, ते पुन्हा घरी येतील"

'द टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी रुग्णालयातील त्या कठीण दिवसांच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, "धर्मेंद्र यांच्या निधनापूर्वीचा एक महिना आमच्यासाठी सतत संघर्षाचा होता. आम्ही सर्वजण-मी, ईशा, अहाना, सनी आणि बॉबी-रुग्णालयात एकत्र होतो.

यापूर्वीही अनेकदा ते आजारी पडून रुग्णालयातून सुखरूप घरी परतले होते. त्यामुळे यावेळीही ते 90 व्या वाढदिवसासाठी (8 डिसेंबर) घरी परततील, अशी आम्हा सर्वांना खात्री होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते."

वाढदिवसाच्या तयारी दरम्यान काळाचा घाला

धर्मेंद्र ८ डिसेंबर रोजी ९० वर्षांचे होणार होते आणि संपूर्ण देओल कुटुंब हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी करत होते. हेमा मालिनी यांनी सांगितले की, १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला धर्मेंद्र यांनी त्यांना खूप प्रेमाने शुभेच्छा दिल्या होत्या. "आमच्या डोळ्यांसमोर त्यांना असे तुटून पडताना पाहणे खूप कठीण होते. कोणावरही अशी वेळ येऊ नये," असे त्या भावूक होऊन म्हणाल्या.

अफवांना चोख प्रत्युत्तर: "मी एक कणखर स्त्री आहे"

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर हेमा मालिनी यांचे रडतानाचे किंवा डोळे सुजलेले अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, "मी लोकांना विनंती करते की अशा कंटेंटवर विश्वास ठेवू नका. माझे चाहते काळजीपोटी मला मेसेज करत आहेत, पण मी एक कणखर व्यक्ती आहे. मी माझ्या भावना प्रदर्शनापेक्षा माझ्या हृदयात जपून ठेवते."

प्रार्थना सभेवरून होणाऱ्या वादावर पडदा

सनी देओलने आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी उपस्थित नव्हत्या, उलट त्यांनी स्वतः वेगळी प्रार्थना सभा घेतली. यामुळे सोशल मीडियावर कुटुंबातील मतभेदांच्या चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले:

"वेगळी प्रार्थना सभा घेणे ही आमची खाजगी बाब आहे. मी माझ्या घरी माझ्या लोकांसाठी प्रार्थना सभा घेतली. त्यानंतर मी खासदार असल्याने दिल्लीतील माझे सहकारी आणि मथुरा मतदारसंघातील लोकांसाठी तिथे कार्यक्रम आयोजित केले. मी जे काही केले त्याबाबत मी समाधानी आहे."

फार्महाऊसच्या आठवणी आणि शेवटच्या भेटी

धर्मेंद्र यांना लोणावळ्यातील आपल्या फार्महाऊसवर वेळ घालवायला खूप आवडायचे. हेमाजींनी आठवण सांगितली की, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःच्या शेतातले तूप काढून ईशा, अहाना आणि माझ्यासाठी प्रेमाने आणले होते.

"जेव्हा मी कामासाठी मथुरा किंवा दिल्लीला जायचे, तेव्हा ते लोणावळ्यात असायचे आणि मी परत आले की ते मुंबईत माझ्या घरी येत असत. आज घरात इडली-सांबार किंवा चटणी-थेपला बनला की त्यांची प्रकर्षाने आठवण येते," असे त्यांनी सांगितले.

सनी देओलचा संताप आणि मीडियाचा त्रास

मुलाखती दरम्यान हेमाजींनी सनी देओलच्या मीडियावरील संतापाचेही समर्थन केले. "आम्ही सर्वजण अत्यंत भावनिक परिस्थितीतून जात होतो आणि मीडियाच्या गाड्या आमचा पाठलाग करत होत्या, ते खूपच त्रासदायक होते. त्यामुळे सनीने व्यक्त केलेला राग स्वाभाविक होता," असे त्यांनी नमूद केले.

हेमा मालिनी यांनी या मुलाखतीतून हे स्पष्ट केले की, धर्मेंद्र यांच्या निधनानंतरही संपूर्ण देओल कुटुंब या दुःखाच्या काळात एकमेकांसोबत उभे आहे. "धरमजी आमच्या हृदयात आणि आठवणींत कायम जिवंत राहतील," या शब्दांत त्यांनी मुलाखतीचा समारोप केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+