'शोले'चे जेलर असरानींची लव्हस्टोरी: 'नमक हराम'च्या सेटवर प्रेम जुळले; 50 वर्षांचा संसार, पण अधुरी...
Bollywood actor Asrani and Manju Asrani love story : बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी (Asrani) यांचे २० ऑक्टोबर २०२५ रोजी ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला.
त्यांच्या कारकिर्दीइतकाच सुंदर होता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अध्याय-तो म्हणजे त्यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री मंजू असरानी यांच्यासोबतची त्यांची प्रेम कहाणी.
१९७० आणि १९८० च्या दशकात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री मंजूसोबत असरानी यांचे प्रेमसंबंध हळूहळू बहरले आणि त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ एकमेकांना साथ दिली. त्यांचे हे नाते बॉलिवूडमध्ये दुर्मिळ मानले जाते. या जोडप्याने एकत्र अनेक चढ-उतार पाहिले.

गोवर्धन असरानी यांची पत्नी मंजू असरानी कोण?
मंजू असरानी (मूळ नाव मंजू बन्सल, जन्म १९५०) या १९७० आणि १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या अभिनेत्री होत्या. त्यांनी असरानींसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात 'आज की ताजा खबर' (१९७३), 'नमक हराम' (१९७३), 'सरकारी मेहमान' (१९७९), 'तपस्या' (१९७६) आणि 'नालायक' (१९८१) यांचा समावेश आहे.
१९८० च्या दशकात अभिनयानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि 'माँ की ममता' (१९८९) आणि 'रिश्ते: रंग दी चुनरिया' (१९९५) यांसारख्या टीव्ही मालिका दिग्दर्शित केल्या. त्यानंतर त्यांनी खासगी आयुष्याला प्राधान्य देत पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. असरानी यांच्या निधनानंतर मंजू यांनी 'माझा जोडीदार गेला आहे' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहिली भेट कशी झाली?
असरानी आणि मंजू यांची पहिली भेट १९७३ मध्ये आलेल्या 'आज की ताजा खबर' या विनोदी चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटात असरानी यांनी चंपक बूमियाची मुख्य भूमिका केली होती, तर मंजू केसरी देसाईच्या भूमिकेत होत्या. याच चित्रपटासाठी असरानी यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सेटवर कामादरम्यान दोघांची मैत्री झाली. विकिपीडियाच्या माहितीनुसार, 'आज की ताजा खबर' आणि त्यानंतर 'नमक हराम' (१९७३) या चित्रपटांच्या सेटवर काम करताना त्यांच्यातील मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली.
एका मुलाखतीत असरानी यांनी सांगितले होते की, "मंजूची साधेपणा आणि कामाप्रती तिची असलेली निष्ठा मला खूप आकर्षित करायची. आमची मैत्री लवकरच लग्नाच्या बंधनात बदलली." त्यांच्या लग्नाची नेमकी तारीख निश्चित नसली तरी, १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी लग्न केले.
प्रेमकहाणीचा ५० वर्षांचा प्रवास: मुले किती?
असरानी (जन्म १ जानेवारी १९४१) आणि मंजू यांची प्रेमकहाणी सेटवर सुरू झाली, जी लग्नानंतरही कायम राहिली. मंजूने असरानी यांच्या अनेक चित्रपटांना पाठिंबा दिला. इतकंच नव्हे तर, १९८० मध्ये असरानी यांनी त्यांच्या होम प्रोडक्शन 'हम नहीं सुधरेंगे' मध्ये मंजूला कास्ट केले.
असरानी नेहमी म्हणत, "मंजू माझी ताकद होती. आम्ही एकत्र सुख-दुःखात साथ दिली." त्यांचे ५० वर्षांहून अधिक काळ टिकलेले वैवाहिक जीवन बॉलिवूडमधील एक आदर्श उदाहरण होते.
मुलांविषयीची माहिती
गोवर्धन असरानी आणि मंजू असरानी यांना मुले नव्हती. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी मंजू असरानी, एक बहीण आणि एक पुतण्या यांचा समावेश होता. असरानींच्या पुतण्याने त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना दिली होती, पण मुलांचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे, ५० वर्षांहून अधिक काळ एकमेकांना साथ दिल्यानंतरही, या जोडप्याला अपत्यसुख लाभले नाही, हीच त्यांच्या आयुष्यातील एक अपूर्णता राहिली. असरानी यांच्या इच्छेनुसार, मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पुतण्या, बहीण आणि पत्नी मंजू यांच्या उपस्थितीत शांतपणे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या जाण्याने देशाने एक मोठ्या कॉमेडियन गमावला आहे, पण त्यांचे कायम लोकांच्या स्मरणात राहिली एवढं मात्र सत्य.












Click it and Unblock the Notifications