मोदींच्या मते...', 'फुले' चित्रपट वादावर अनुराग कश्यप संतापले! ब्राह्मण अन् जातीव्यवस्थेवरही भाष्य
Anurag Kashyap : अभिनेता प्रतीक गांधी व पत्रलेखा यांचा 'फुले' हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्रासह देशभरात या चित्रपटावरुन वाद पाहायला मिळत आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाची कहाणी आहे. परंतु, या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
या चित्रपटावर सद्या जातीयवाद पसरवला जात असल्याचा आरोप काही संघटना व समाजबांधवांकडून केला जात आहे. त्यामुळे काही लोकांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला. दरम्यान, या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी संतप्त भावना व्यक्त केली.

पोस्टमध्ये काय म्हणाले अनुराग कश्यप?
फुले चित्रपटावर सेन्सॉर बोर्डने लावलेल्या बंदीवरुन आता अनुराग कश्यपने त्यांच्या इंस्टा स्टोरीवर चित्रपटाच्या वादाशी संबंधित एक बातमी शेअर केली. त्यात लिहिले की,अनुरागने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित होते. भावा, जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती?, आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटतेय किंवा लाजेनं ते मरतायत किंवा वेगळेच ब्राह्मण भारतात जगतायत ज्यांना आपण पाहू शकत नाहीये, चु...कोण आहे कोणी तरी समजवावं'.
सेन्सॉरशिपच्या प्रक्रियेवरही लगावला निशाणा
अनुराग कश्यप यांनी आणखी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी फिल्म सेन्सॉरशिपच्या प्रक्रियेवरही जोरदार निशाणा साधला. काही गटाच्या लोकांना प्रदर्शित न झालेले चित्रपट कसे पहायला मिळतात यावरून प्रश्न उपस्थित केला. 'माझा असा प्रश्न आहे की, जेव्हा एखादा चित्रपट सेन्सॉरिंगसाठी जातो, तेव्हा बोर्डात चार सदस्य असतात. मग विविध गट आणि पक्षाच्या लोकांना परवानगी मिळाल्याशिवाय हे चित्रपट कसे पहायला मिळतात? संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट आहे'. याविषयी त्याने पुढे म्हटले की, 'जातीयवाद, प्रादेशिक वाद, वर्णद्वेषी सरकार यावंर उघडपणे भाष्य करणाऱ्या आणखी किती चित्रपटांना अशा प्रकारे अडकवून ठेवलंय काय माहीत? आपलाच चेहरा आरशात बघण्याची त्यांना लाज वाटतेय. त्यांना इतकी लाज वाटतेय की चित्रपटातील कोणत्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत यावर ते उघडपणे बोलूही शकत नाहीत. भित्रे कुठले!
'मोदी म्हणतात..भारतात जातीयवाद..
पुढे जाऊन दुसरी एक इंन्स्टा पोस्ट त्यांनी प्रदर्शित केली. अनुराग कश्यपने इंस्टाग्रामवर एक वेगळी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'धडक 2' च्या प्रदर्शनाच्या वेळी सेन्सॉर बोर्डाने म्हटले होते की, मोदीजींनी भारतातून जातीयवाद संपवला आहे. त्याच कारणास्तव संतोष भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मणाला फुलेंशी समस्या आहे.
भाऊ, जेव्हा जातीयवादच नाही तर तो कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे? तू कोण आहेस? तू रागाने का जळत आहेस? जेव्हा जातीयवाद नव्हता तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई का होते? एकतर तुमचा ब्राह्मण समुदाय इथे नाहीये कारण मोदींच्या मते भारतात जातीयवाद नाहीये. किंवा सगळे मिळून सर्वांना मूर्ख बनवत आहेत. भाऊ, एकत्र निर्णय घ्या. भारतात जातीयवाद आहे की नाही? लोक मूर्ख नाहीत.
11 एप्रिल रोजी 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
'फुले' चित्रपटाला सेंसॉर बोर्डाकडून 'यू' प्रमाणपत्र मिळाले. परंतु, सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात अनेक बदल करण्यास सांगितले. चित्रपटातून 'मांग', 'महार', 'पेशवाई' हे शब्द काढून टाकण्यात आले. तसेच 'तीन हजार वर्षे जुनी गुलामगिरी' हा संवाद 'अनेक वर्षे जुनी गुलामगिरी' मध्ये या शब्दात बदण्यात आला. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता. आता दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित करणार आहेत.












Click it and Unblock the Notifications