CBSE च्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क पडतातच कसे? कसे असते परिक्षा माॅडेल? समोर आले 'हे' कारण
स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अनेकदा जास्त मार्क मिळतात. कित्येक वेळा तर सीबीएसईचे विद्यार्थी १०० पैकी १०० मार्क मिळवतात. सीबीएसईचा आभ्यास कठीण असल्याचे एकीकडे सांगितले जाते तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांना एवढे जास्त मार्क कसे पडतात, असा प्रश्नही उपस्थित केला जातो. विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क पडतातच कसे, हा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूयात.

मॉडरेशन पॉलिसी म्हणजे काय?
परीक्षेच्या निकालांमध्ये अतिरिक्त गुण देण्याच्या धोरणाला मॉडरेशन पॉलिसी असे म्हणतात. इतर शिक्षण मंडळांप्रमाणे, सीबीएसई देखील आपल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देते. परीक्षेत विचारलेल्या कठीण प्रश्नांसाठी हे ग्रेस मार्क दिले जातात. जर बोर्डाला एखाद्या विशिष्ट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कठीण वाटत असतील तर ते विद्यार्थ्यांना १५ टक्क्यांपर्यंत ग्रेस गुण देते. सीबीएसईने जास्तीत जास्त १५ टक्के ग्रेस गुण दिले होते.
कसे आहे सीबीएसईचे धोरण?
सीबीएसईने १९९२ मध्ये मॉडरेशन पॉलिसी स्वीकारली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त १५ टक्के अतिरिक्त गुण (ग्रेस मार्क्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीबीएसईने म्हटले आहे की, प्रश्नपत्रिकांचे अनेक संच तयार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे जेणेकरून जर कोणतीही प्रश्नपत्रिका कठीण असेल तर विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देऊन दिलासा देता येईल.
कशी असते प्रश्नपत्रिका?
सीबीएसई प्रश्नपत्रिकांचे तीन संच बनवते. त्यापैकी एक इतर दोघांपेक्षा जास्त कठीण आहे. परीक्षेनंतर सीबीएसईला विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून प्रश्नपत्रिकांबाबत तक्रारी येतात. ज्याच्या आधारे सीबीएसईची पुनरावलोकन समिती प्रश्नपत्रिकेची तुलना इतर बोर्डांशी देखील करते. यानंतर प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ठरवली जाते आणि त्यानंतर त्यावर आधारित, द्यायचे ग्रेस मार्क ठरवले जातात. या ग्रेस मार्कांमुळेच अनेकदा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क दिले जातात.
काय आहेत पॉलिसीचे फायदे?
विद्यार्थ्यांना मॉडरेशन पॉलिसीचा लाभ मिळतो. ग्रेस मार्क मिळाल्याने, विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारी देखील वाढते. जर एखादा विद्यार्थी कोणत्याही एका प्रश्नपत्रिकेत नापास झाला तर या धोरणानुसार त्याला अतिरिक्त गुण देऊन उत्तीर्ण केले जाते. यासोबतच, उच्च कट ऑफ असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या शर्यतीत विद्यार्थी चांगल्या गुणांसह अर्ज करू शकतात.












Click it and Unblock the Notifications