JEE, NEET च्या विद्यार्थ्यांबाबत CBSE चा मोठा निर्णय; 'त्या' विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही
केंद्रीय माध्यमिक शिक्षण म्हणजेच CBSE ने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी जेईई, नीट आदी परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग संस्थेत शिकत घेतात परंतु शाळेत उपस्थित राहत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना आता परिक्षेला बसता येणार नाही. 12 वी बोर्ड परीक्षेला या विद्यार्थ्यांना बसू न देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. या निर्णयाचा सगळ्यात जास्त परिणाम बिहार, दिल्ली, कोटा आणि इतर राज्यांतीव विद्यार्थ्यांवर पडणार आहे.

नेमका काय घेतला निर्णय?
सीबीएसई बोर्डाने शाळा बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला. जेईई, नीट अशा स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी बारावीचे विद्यार्थी हे कोचिंग क्लास लावतात आणि तेथेच तयारी करतात. ते शाळेत येत नाही व शाळेला दांडी मारतात. या विद्यार्थ्यांबाबत सीबीएसई बोर्डाने कठोर पावले उचलली आहेत. आता शाळा बुडविणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या परिक्षेला बसता येणार नाही.
सीबीएसईने दोनदा केली तपासणी
सीबीएसईने देशभरातील शाळांची वर्षभरात दोनदा तपासणी केली. त्यात सीबीएसईला अनेक गंभीर बाबी दिसल्या. काही शाळा या कोचिंग संस्थेशी संगमनमत करुन विद्यार्थ्यांना शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देतात. मग हे विद्यार्थी शाळांऐवजी कोचिंगलाच उपस्थित राहतात. अशा प्रकरणात शाळांतील हजेरी कमी असली तरी विद्यार्थी परिक्षेला बसतात. बिहार, दिल्ली, कोटा आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांत सीबीएसईने ही तपासणी केली होती.
सीबीएसई काय म्हणते?
गेल्यावर्षीही सीबीएसईने या प्रकरणात गांभीर्याने मत नोंदवले होते. शाळेत डमी किंवा गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू देऊ नका, असे सीबीएसईने शाळांना सांगितले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होण्यासाठी त्यांची शाळेतील हजेरी आवश्यक आहे, असे सीबीएसईचे म्हणणे होते. सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग म्हणाले की, बोर्डाने व्हिडीओग्राफीद्वारे काही शाळांची तपासणी केली. सीबीएसईच्या शाळा या मंडळाच्या नियमानुसार चालतात की नाही, हे आम्हाला पहायचे होते. त्यात हा प्रकार आढळला.












Click it and Unblock the Notifications