मुंबई HCचा गौतम अदानी व राजेश अदानींना दिलासा; 388 कोटींच्या फसवणूक प्रकरणी केले दोषमुक्त
Gautam Adani Latest Marathi News : मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी यांना दिलासा दिला आहे. दोघांवर असलेल्या सुमारे 388 कोटी रुपयांच्या बाजार नियमन उल्लंघनाच्या कथित प्रकरणातून न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर खटला हा 2012 मधील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने (SFIO) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) आणि त्यांच्या प्रवर्तकांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.

सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी केली होती याचिका
विशेष म्हणजे, 2019 मध्ये, गौतम अदानी आणि राजेश अदानी यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत धाव घेतली होती. ज्यात त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. सोमवारी, न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला, ज्यामुळे अदानींना प्रभावीपणे निर्दोष मुक्तता मिळाली आहे.
2012 मध्ये गौतम अदानींसह 12 जणांवर झाले होते आरोप
2012, मध्ये, एसएफआयओने अदानींसह 12 जणांवर आरोप लावले होते. मुंबईतील एका दंडाधिकारी न्यायालयाने मे 2014 मध्ये या दोघांना दोषमुक्त केले, परंतु एसएफआयओने त्या निर्णयाला आव्हान दिले. नोव्हेंबर 2019 मध्ये, सत्र न्यायालयाने मॅजिस्ट्रेटचा आदेश रद्दबातल ठरवला, ज्यामध्ये असे म्हटले होते की SFIO ने अदानी समूहाने कथित बेकायदेशीर नफा मिळवल्याचा खटला सादर केला होता. नंतर अदानींनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याला "मनमानी आणि बेकायदेशीर" असे संबोधले होते.












Click it and Unblock the Notifications