जिओ, एअरटेल देणार महागाईचा झटका, रिचार्जच्या दरात होणार वाढ
मुंबई: भारतात टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांचा दबदबा आहे. पण आता जिओने ग्राहकांना चांगलाच धक्का दिला आहे. दोन्ही कंपन्यांकडून रिचार्जचे दर वाढवले जाणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.
जिओ'कडून मोबाइल दरांत 12-17 टक्क्यांची वाढ
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने आपल्या विविध मोबाईल सेवांच्या दरात 12 ते 17 टक्क्यांनी वाढ केली आहे. खरंतर येत्या 3 जुलैपासून मोबाइल सेवांच्या दरांत ही वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर जिओचे कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

जिओने स्पष्ट केली भूमिका
अडीच वर्षांच्या कालावधीनंतर जिओने मोबाईल सेवांच्या दरांमध्ये वाढ केल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. नवीन योजना आणणे हे उद्योगातील नावीन्यपूर्णतेला चालना देण्याच्या दिशेने आणि 5 जी आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे शाश्वत वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले.
असे बदलले दर
जिओने जवळपास सर्व प्रकारच्या मोबाईल पॅकवरील कालावधीच्या योजनांवरील सेवांचे दर वाढवले आहेत. सर्वात कमी रिचार्जची किंमत आता 27 टक्क्यांनी वाढून 19 रुपये करण्यात आली आहे, त्यासाठी आधी 15 रुपये आकारले जात होते. 75 जीबी डेटा पोस्टपेड प्लॅनची किंमत आता 399 रुपयांच्या तुलनेत 449 होणार आहे.
तसेच जिओने 84 दिवसांच्या वैधतेसह 666 रुपयांच्या लोकप्रिय अमर्यादित प्लॅनची किंमतदेखील सुमारे 20 टक्क्यांनी वाढवून 799 रुपये केली आहे. वार्षिक रिचार्ज प्लॅनच्या किमती 1599 रुपयांवरून 1899 रुपयांपर्यंत आणि 2999 रुपयांवरून 3599 रुपयांपर्यंत म्हणजेच 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत.
लिलावातील बोलीवर कंपन्यांनी केलेला खर्च आता दरवाढीतून ग्राहकांकडून वसूल केला जाईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या अव्वल दोन कंपन्यांचा या क्षेत्राच्या 78 टक्के बाजारपेठेवर कब्जा आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील व तुलनेत खूप छोट्या असलेल्या व्होडाफोन आयडियाने ताज्या लिलावात सर्वाधिक 3510.40 कोटी रुपये स्पेक्ट्रम खरेदीवर खर्च केले आहेत.
त्यामुळे कंपन्या आता ही रक्कम ग्राहकांकडून वसूल करतील असेच दिसत आहे. एअरटेल जुलै मध्ये आपल्या नव्या दरांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
यामध्ये टेलिकॉम कंपन्यांतील स्पर्धा देखील विचारात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे दरवाढ करताना एअरटेल आणि आयडिया अर्थात वी. आय कंपन्या नेमकी कोणती शक्कल लढवताता, स्पर्धा विचारात घेत दर कमी ठेवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे जिओचे ग्राहक एअरटेलकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications