खासगी नोकरी करणाऱ्यांनाही मिळणार 'लाईफटाईम' पेन्शन! जाणून घ्या 10 वर्षांचा 'हा' फॉर्म्युला आणि अटी
Epfo pension rules 2026 : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी पीएफ (PF) जितका महत्त्वाचा आहे, तितकीच महत्त्वाची आहे ईपीएफओची (EPFO) पेन्शन योजना. अनेकदा कर्मचारी पीएफ बॅलन्सवर लक्ष देतात, पण पेन्शनच्या (EPS) नियमांबाबत अनभिज्ञ असतात. निवृत्तीनंतर दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळावे यासाठी १० वर्षांचा एक विशेष नियम पाळणे आवश्यक आहे. ही पेन्शन नक्की कशी मिळते आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

पेन्शन मिळवण्यासाठी महत्त्वाच्या २ अटी
ईपीएस (EPS) अंतर्गत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला खालील दोन प्रमुख अटींची पूर्तता करावी लागते: १. १० वर्षांची सेवा: कर्मचाऱ्याची किमान १० वर्षांची नोकरी पूर्ण होणे अनिवार्य आहे. २. ५८ वर्षे वय: नियमित पेन्शन सुरू होण्यासाठी कर्मचाऱ्याचे वय ५८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
पेन्शन फंडातील पैसे कसे जमा होतात?
कर्मचाऱ्याच्या पगारातून जो पीएफ कापला जातो, त्यात नियोक्ता (Employer) देखील वाटा देतो. या नियोक्त्याच्या वाट्यापैकी ८.३३% रक्कम थेट पेन्शन फंडात (EPS) जमा होते. मात्र, याची गणना एका निश्चित वेतन मर्यादेवर केली जाते, ज्यामुळे पेन्शनची रक्कम ही ठराविक मर्यादेत राहते.
लवकर पेन्शन घेतल्यास मोठे नुकसान!
जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाची ५८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षी 'अर्ली पेन्शन' घेण्याचा निर्णय घेतला, तर त्याला दरमहा मिळणाऱ्या रकमेत कायमस्वरूपी कपात केली जाते. याउलट, ५८ वर्षांनंतर पेन्शन घेण्यास उशीर केल्यास पेन्शनच्या रकमेत थोडी वाढ होऊ शकते.
१० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली तर काय?
जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला दरमहा पेन्शन मिळण्याचा अधिकार राहत नाही. अशा परिस्थितीत, ईपीएफओ (EPFO) सेवेच्या कालावधीनुसार एक ठराविक रक्कम एकदाच (Lumpsum) कर्मचाऱ्याला परत करते. याला 'लाईफटाईम पेन्शन'चा पर्याय मानले जात नाही.
नोकरी बदलताना ही खबरदारी घ्या
नोकरी बदलताना पीएफ (PF) ट्रान्सफर करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी पीएफची रक्कम काढून घेतली, तर तुमची 'पेन्शन योग्य सेवा' (Pensionable Service) खंडित होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम भविष्यातील पेन्शनवर होतो.












Click it and Unblock the Notifications