EPFOचा मोठा डिजिटल धमाका! आता UPI द्वारे काढता येणार PFचे पैसे; मार्चमध्ये नवीन ॲप लाँच!
EPFO New App 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 8 कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी आता लांबलचक प्रक्रियेची वाट पाहावी लागणार नाही. EPFO लवकरच आपले स्वतंत्र नवीन मोबाईल ॲप लाँच करत असून, याद्वारे सदस्य थेट UPI (Unified Payments Interface) वापरून आपल्या खात्यातून पैसे काढू शकतील. मार्च ते एप्रिल-2026 दरम्यान हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ॲपची वैशिष्ट्ये अन् कार्यपद्धती
हे नवीन ॲप सध्याच्या 'उमंग' (UMANG) ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि प्रगत असेल. याचे मुख्य आकर्षण म्हणजे UPI एकीकरण.
बँक खात्याशी लिंक : हे ॲप सदस्याच्या सीडेड बँक खात्याशी आणि भीम (BHIM) किंवा इतर UPI ॲप्सशी जोडलेले असेल.
थेट व्यवहार : सदस्य ॲपमध्ये लॉगिन करून आपली 'पात्र शिल्लक' (Eligible Balance) पाहू शकतील आणि UPI पिन टाकून व्यवहार पूर्ण करता येईल.
झटपट हस्तांतरण : व्यवहार पूर्ण होताच पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. यामुळे क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
इतर सेवा : या ॲपवर पासबुक तपासणे, शिल्लक पाहणे यांसारख्या सेवाही उपलब्ध असतील.
सध्या चाचणी सुरू: तांत्रिक त्रुटींवर काम
कामगार मंत्रालय या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर वेगाने काम करत आहे.
डमी खात्यांवर टेस्टिंग: सध्या १०० डमी खात्यांवर या ॲपची चाचणी घेतली जात आहे.
सुरक्षा आणि अचूकता : व्यवहार करताना कोणत्याही तांत्रिक त्रुटी येऊ नयेत यासाठी ही चाचणी अत्यंत सूक्ष्मपणे केली जात आहे.
मर्यादा : EPFO च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, पीएफचा काही भाग 'फ्रोज' (गोठवलेला) राहील, तर मोठा भाग बँक खात्यातून UPI द्वारे काढता येईल.
सदस्यांना होणारे फायदे
ही नवीन सुविधा आल्यामुळे पीएफ काढणे अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे.
तातडीच्या गरजा: आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी तातडीने पैशांची गरज असल्यास अवघ्या काही मिनिटांत निधी उपलब्ध होऊ शकेल.
बँकिंग दर्जाची सेवा : EPFO आपल्या सेवांना व्यावसायिक बँकिंग स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वतंत्र अस्तित्व : नवीन ॲप स्वतंत्रपणे काम करेल, मात्र सध्याचे UAN पोर्टल आणि उमंग ॲप या सेवादेखील सुरूच राहतील.
EPFO 3.0 : डिजिटल क्रांतीच्या दिशेने
सध्या पीएफ काढण्यासाठी पोर्टलवर क्लेम दाखल करावा लागतो, ज्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. जरी ऑटो-सेटलमेंटमुळे हा वेळ कमी झाला असला, तरी UPI द्वारे थेट पैसे काढणे ही एक मोठी क्रांती ठरेल.
दरवर्षी EPFO कडे 5 कोटींहून अधिक क्लेम येतात. यापूर्वी क्लेमची मर्यादा 1 लाखावरून 5 लाख करण्यात आली आहे. आता EPFO 3.0 अंतर्गत डिजिटल दावे आणि जलद पडताळणीवर भर दिला जात आहे.












Click it and Unblock the Notifications