संजू सॅमसनने बीसीसीआयसोबत घेतला पंगा! आता आलं क्रिकेट करिअर धोक्यात?
Sanju Samson News : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा खेळाडू संजू सॅमसन मोठ्या अडचणीत सापडला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो केरळकडून एकही सामना खेळला नाही. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय संघाची निवड आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी संजू सॅमसनने हा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत त्याला या दोन्ही स्पर्धांपासून दूर राहावे लागू शकते.
संजूच्या निर्णयाची चौकशी केली जाईल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संजू सॅमसनच्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये सहभागी न होण्याच्या निर्णयाची चौकशी करण्यास सज्ज झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आल्यामुळे सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घेतला नाही. काही बोर्ड अधिकाऱ्यांनी त्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अनेक वर्षे भारतीय संघात आत-बाहेर राहिल्यानंतर गेल्या काही टी-20 मालिकांमध्ये संजू सॅमसनला सातत्याने संधी मिळत आहेत. परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी सुरू असलेल्या 50 षटकांच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाने त्याने निवडकर्त्यांना आणि बीसीसीआयला निराश केलं आहे.
संघातून वगळण्याची शक्यता
भारतीय विकेटकिपर-फलंदाज असलेल्या संजूला संघातून वगळण्याची शक्यता आहे. जर त्याने विजय हजारे ट्रॉफी 2024-25 साठी स्वतःला उपलब्ध न करण्याचे योग्य कारण दिले नाही तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळले जाऊ शकते. एवढेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पुन्हा त्याच्या नावाचा विचार करणे कठीण होईल.
अय्यर-किशनला शिक्षा झाली
टाईम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, निवड समिती आणि बोर्ड देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वाबाबत अगदी स्पष्ट आहेत. गेल्या वर्षी, परवानगीशिवाय देशांतर्गत सामने न खेळल्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आलं होतं. सॅमसनच्या बाबतीतही तो स्पर्धेत का खेळला नाही याचे कोणतेही कारण बोर्ड आणि निवडकर्त्यांना देण्यात आलेलं नाही.












Click it and Unblock the Notifications