बेंगळुरूशी नाते तुटले! IPL-2026 मध्ये RCBचे घरचे सामने 'या' दोन शहरांत; कोहलीसाठी नवे 'होम ग्राऊंड'
RCB Home Matches IPL 2026 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि एम. चिन्नास्वामी स्टेडियमचे अतूट नाते 2026 च्या हंगामात संपुष्टात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 'लाल समुद्रा'ने न्हाऊन निघणारे चिन्नास्वामी आता आरसीबीच्या जल्लोषाला मुकणार आहे. आरसीबीने आयपीएल 2026 साठी आपली दोन नवीन 'होम ग्राऊंड्स' निश्चित केली असून, विराट कोहलीचा संघ आता नवी मुंबई आणि रायपूर येथे आपले घरचे सामने खेळणार आहे.

बेंगळुरूबाहेर जाण्याची वेळ का आली?
आरसीबीने आयपीएल 2025चे विजेतेपद जिंकल्यानंतर बेंगळुरूच्या रस्त्यांवर अभूतपूर्व गर्दी झाली होती. या 'विजय परेड' दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये काही जीवितहानी आणि अनेक नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर सुरक्षा कारणास्तव आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमला मोठ्या स्पर्धांसाठी सध्या असुरक्षित मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रँचायझीने हा अत्यंत कठीण पण सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सामन्यांचे नियोजन: कुठे आणि किती सामने?
मिळालेल्या वृत्तानुसार, आरसीबी आपल्या वाटणीचे 7 घरचे सामने खालीलप्रमाणे विभागून खेळणार आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई : येथे आरसीबी ५ सामने खेळण्याची शक्यता आहे. हे स्टेडियम आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असून येथे प्रेक्षक क्षमतेसह गर्दी नियंत्रणाचे चांगले नियोजन आहे.
शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम, रायपूर : उर्वरित २ सामने रायपूरच्या या भव्य स्टेडियमवर खेळवले जातील. रायपूरच्या खेळपट्टीवर फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते, ज्यामुळे आरसीबीच्या गोलंदाजीला बळ मिळू शकते.
विराट कोहली व नव्या मैदानाचा 'कसोटी' काळ!
विराट कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक धावा चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर केल्या आहेत. तिथल्या लहान सीमारेषा आणि चाहत्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज विराटासाठी उर्जा असायचा. रायपूरचे मैदान चिन्नास्वामीच्या तुलनेत मोठे आहे. येथे षटकार मारणे तितके सोपे नसेल, त्यामुळे फलंदाजांना आपली रणनीती बदलावी लागेल. मुंबईत आधीच आरसीबीचे मोठे फॅन बेस आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर विराटाच्या नावाचा जयघोष चिन्नास्वामीची उणीव भरून काढतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पुणे शर्यतीतून का बाहेर पडले?
सुरुवातीला पुण्यातील गहुंजे स्टेडियम आरसीबीचे नवे होम ग्राऊंड असेल अशी चर्चा होती. मात्र, तांत्रिक बाबी आणि लॉजिस्टिक कारणांमुळे ही चर्चा मागे पडली. राजस्थान रॉयल्सने आपले सामने पुण्यात खेळवण्याबाबत रस दाखवल्याने आरसीबीने नवी मुंबई आणि रायपूरला पसंती दिली आहे.
चाहत्यांची भावना!
'ई साला कप नमदे' म्हणत १७ वर्षे वाट पाहिल्यानंतर जेतेपद मिळाले, पण आता जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी घरचे मैदानच नसल्याने बेंगळुरूमधील चाहत्यांमध्ये निराशेची भावना आहे. तरीही, विराट कोहली जिथे जाईल तिथे चाहत्यांची गर्दी होणार हे मात्र निश्चित!












Click it and Unblock the Notifications