IPLला न्यू चॅम्पियन मिळणार;RCB-PBKSमैदानात विजयासाठी उतरतील, जाणून घ्या दोन्ही संघाचा ट्रॅक रेकॉर्ड
PBKS vs RCB final of IPL 2025 : कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये 5 वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि 11 वर्षांनी इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे.
विशेष बाब म्हणजे, पंजाब किंग्जने शेवटचा आयपीएल फायनल 2014 मध्ये खेळला होता आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. आयपीएलच्या इतिहासात एकूण 18 हंगाम झाले आहेत. यात पंजाब संघ प्लेऑफ आणि फायनलमध्ये पोहोचण्याची ही फक्त दुसरी वेळ आहे.
दरम्यान, आता आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे. त्यामुळे पंजाब आणि बंगळुरु या दोन्ही संघाचा ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो, याविषयी देखील आपण आज जाणून घेणार आहोत..आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात दोन्ही संघांनी किती वेळा विजय मिळवला, किती वेळा पराभवाला सामोरे जावे लागले, तर कधी नशीबाने हुलकावणी दिली, याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत...!
3 जून रोजी पंजाव विरुद्ध बंगळुरु यांच्यात रणसंग्राम!
तर आता 3 जून रोजी होणाऱ्या जेतेपदाच्या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहे. हा रणसंग्राम खरच पाहण्यासारखा असणार आहे, कारण आय़पीएलला यंदा नवा चॅम्पियन मिळणार आहे.

यंदा आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार
पंजाब किंग्ज आणि आरसीबी दोघेही त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाची वाट पाहत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 व्यांदा आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचला, परंतु त्यांना कधीही जेतेपद मिळवता आले नाही.
आरसीबी संघ आयपीएल फायनल खेळण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 मध्ये त्यांना अनुक्रमे डेक्कन चार्जर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आरसीबीसोबतच आहे. तो त्याच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे. 29 मे रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

IPLमध्ये 200+ धावा काढल्यानंतर MIचा पहिलाच पराभव
मुंबईचा हा स्कोअर देखील महत्त्वाचा होता कारण आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात या सामन्यापूर्वी 200 धावांचा टप्पा गाठल्यानंतर हा संघ कधीही पराभूत झाला नव्हता. प्रत्येक वेळी या संघाने 200 किंवा त्याहून अधिक धावा काढल्यानंतर यशस्वीरित्या बचाव केला होता.
मुंबईसाठी जॉनी बेअरस्टोने 38 धावा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने 44-44 धावा अशा उपयुक्त खेळी केल्या. शेवटच्या षटकांमध्ये नमन धीरने 37 धावा अशा वेगवान खेळी खेळल्या आणि त्यांच्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

पंजाबने मुंबईच्या खेळाडूंना असे पाठवले घरी
पंजाब किंग्जकडून अझमतुल्लाह उमरझाईने 2 बळी घेतले आणि जेमीसन, स्टोइनिस, विजयकुमार वैश्य आणि चहल यांनी 1-1 बळी घेतले. दबावाच्या सामन्यात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांना पहिला धक्का प्रभसिमरन सिंगच्या रूपात फक्त 13 धावांवर बसला. तो 6 धावा काढून ट्रेंट बोल्टचा बळी ठरला.
यानंतर, प्रियांश आर्य आणि जोश इंगलिस यांनी पंजाबचा स्कोअरबोर्ड थांबू दिला नाही आणि दुसऱ्या विकेटसाठी 42 धावा लवकर जोडल्या. 55 धावांवर, प्रियांश आर्य अश्विनी कुमारच्या चेंडूवर हार्दिक पंड्याकडे झेल देऊन पंजाबला दुसरा धक्का दिला.
20 धावा काढून आर्य पॅव्हेलियनमध्ये परतला. जोश इंगलिस 38 धावा काढून पंड्याचा बळी ठरला आणि 72 धावांच्या स्कोअरवर किंग्जला तिसरा धक्का बसला.
येथून, कर्णधार श्रेयस अय्यरने नेहल वधेरासोबत चौथ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले.
पंजाबने 156 धावांवर चौथी विकेट गमावली आणि नेहल वधेरा 48 धावा करून अश्वनी कुमारच्या चेंडूवर मिशेल सँटनरकडे झेलबाद झाला. या धक्क्यातून पंजाब अजून सावरला नव्हता तेव्हा 169 धावांवर शशांक सिंगच्या रूपात त्यांचा पाचवा विकेट गेला.
अय्यरची आयपीएलमधील कामगिरी घ्या जाणून?
श्रेयस अय्यरने एका दशकानंतर त्यांच्या संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवल्याशिवाय विश्रांती घेण्याचा निर्धार केला होता. श्रेयस अय्यर आणि पंजाब किंग्ज पुढील अनेक वर्षे लक्षात ठेवतील अशी एक संस्मरणीय खेळी. कर्णधाराची एक शानदार खेळी. श्रेयसने 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 87 धावांची नाबाद खेळी केली.
अश्वनी कुमारच्या 19 व्या षटकात त्याने 4 षटकारांसह 26 धावा केल्या. या षटकात अश्वनीने एक नो बॉल आणि एक वाइड बॉल टाकला. अशाप्रकारे, 1 षटक शिल्लक असताना, अय्यरने षटकार मारून सामना संपवला आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.
श्रेयस अय्यरने अवघ्या पाच वर्षांत त्याच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींना आयपीएलच्या भव्य अंतिम फेरीत नेले आहे. त्याने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले, 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले आणि आता पंजाब किंग्जला त्यांच्या दुसऱ्या आयपीएल अंतिम फेरीत नेले आहे.
पंजाब-मुंबई सामन्यात अनेक विक्रम रचले
मुंबई इंडियन्सचा अहमदाबादमध्ये सलग सहावा पराभव आहे. 2014 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध येथे त्यांचा एकमेव विजय होता. आयपीएल प्लेऑफ/नॉकआउट सामन्यांमध्ये हा आतापर्यंतचा सर्वाधिक धावसंख्या आहे.
पंजाब किंग्जपूर्वी, कोणताही संघ आयपीएल प्लेऑफ/नॉकआउट सामन्यात 203 धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही. त्याच वेळी, 200+ धावा करूनही मुंबईला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला.












Click it and Unblock the Notifications