यांना माज तरी कसला? पाकड्यांच्या कर्णधाराची जळाली अन् त्याने केलं असं काही कृत्य, की....
क्रिकेटच्या मैदानावरील पराभव आणि मैदानावरील मुजोरपणा यामुळे पाकिस्तानचा संघ सध्या जोरदार टीकेचा धनी ठरत आहे. आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केले आणि सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. मात्र, या विजयानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात जे नाट्य घडले, त्यामुळे खेळापेक्षा राजकारण आणि विवाद अधिक चर्चेत आले आहेत.

उपविजेत्या कॅप्टनचा संतापजनक 'चेक थ्रो'
सामना संपल्यानंतर उपविजेत्या पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा याने स्टेजवर जो माज दाखवला, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गैरवर्तन म्हणून पाहिला जात आहे. पाकिस्तानचा संघ उपविजेता ठरल्यामुळे त्याला ७५ हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे १२ कोटी रुपये) रकमेचा धनादेश (चेक) प्रदान करण्यात आला. मोहसीन नक्वी (ACC अध्यक्ष आणि PCB चेअरमन) यांच्याकडून हा चेक स्वीकारताच, पुढील क्षणाला सलमान आगा याने तो स्टेजवर फेकून दिला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आगाचे हे कृत्य पाहून स्टेजवरील मान्यवर आणि महिला अधिकारी गोंधळल्या. स्टेजवर उपस्थित असलेली एक महिला 'हा खरंच चेक फेकलाय का?' अशा अविर्भावात त्याच्याकडे पाहत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. १२ कोटी रुपयांच्या बक्षीसाचा असा अपमान केल्याबद्दल सलमान आगा याच्यावर चाहत्यांकडून आणि समालोचकांकडून जोरदार टीका होत आहे.
पाकिस्तानच्या कर्णधाराचा संताप कशासाठी?
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सलमान आगा याने आपल्या कृतीचे समर्थन करताना भारतीय संघावरच टीका केली. "भारताने या स्पर्धेत जे केले ते अत्यंत निराशाजनक आहे. ते केवळ आमचाच नाही, तर क्रिकेट या खेळाचा अनादर करत आहेत," असे तो म्हणाला. भारताच्या संघाने स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करणे आणि बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकणे, या दोन प्रमुख कारणांमुळे सलमान आगाचा संताप वाढला होता.
salman ali agha received and throw away runner-up award. #PakistanCricket #INDvPAK #PakVsInd pic.twitter.com/TgBIh9e5tJ
— Moosa (@ImMoss0) September 28, 2025
वादाचे मूळ: भारताचा 'ट्रॉफी अस्वीकार'
हा संपूर्ण वाद भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने सुरू झाला. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. राजकीय तणावामुळे, भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला आणि अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी यांच्याकडून चषक स्वीकारण्याची मागणी केली.
भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे आणि नक्वी यांच्या आग्रहामुळे बक्षीस वितरण समारंभ दीड तास उशिरा सुरू झाला. अखेर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी न देताच विजेतेपदाचा सोहळा पार पडला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत, "एखाद्या विजेत्या संघाला ट्रॉफी नाकारली जावी, असे मी कधीही पाहिले नाही," असे बोलून नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयनेही या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
मैदानावरील कामगिरी: तिलक वर्मा ठरला 'हिरो'
मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. पाकिस्तानने दमदार सुरुवात करत ९.४ षटकांत बिनबाद ८४ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी केलेल्या जादुई गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांनी पुढील ३३ धावांमध्ये ८ विकेट्स गमावल्या आणि संपूर्ण संघ १९.१ षटकांत केवळ १४६ धावांवर गारद झाला.
प्रत्युत्तरादाखल, भारताची सुरुवातही खराब झाली आणि संघाची धावसंख्या २० असतानाच तीन महत्त्वाचे गडी तंबूत परतले. अशा वेळी तिलक वर्मा (नाबाद ६९ धावा) आणि संजू सॅमसन (२४ धावा) यांनी डाव सावरला. त्यानंतर शिवम दुबे (३३ धावा) च्या मदतीने तिलक वर्माने संघाला विजयाच्या जवळ नेले आणि रिंकू सिंग याने विजयी चौकार मारत भारताच्या विक्रमी नवव्या आशिया चषक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिलक वर्माला सामनावीर तर अभिषेक शर्माला मालिकावीर घोषित करण्यात आले.
एकंदरीत, दुबईतील आशिया चषक फायनल क्रिकेटच्या विक्रमांपेक्षा राजकीय संघर्ष आणि खेळाडूंच्या गैरवर्तनामुळे अधिक गाजली, ज्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.












Click it and Unblock the Notifications