महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : पंचाना लाथ मारणाऱ्या शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास 3 वर्ष बंदी!
Maharashtra Kesari Wrestling : अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राडा झाला. उपांत्य सामन्यात कुस्तीपटू शिवराज राक्षेचा पराभव झाला. हा पराभव सहन न झाल्याने त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि मनात राग होता. त्याचीच परिणीती समोर आली असून त्याने संतप्त असतानाच पंचाना लाथ मारली. यामुळे एकच गोंधळ उडाला असून आता शिवराज राक्षेवर राज्य कुस्तीगिरी परिषदेने बंदी घातली आहे. त्याला आता तीन वर्ष कुस्ती खेळता येणार नाही.
अंतीम लढतीत पुण्याचा पैलवान विजयी
उपांत्य सामन्याच्या राड्यानंतर अंतिम लढत झाली. यामध्ये पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा काल संध्याकाळी झाला.

शिवराज राक्षेला तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाही
राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, "पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होते. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचे कृत्य केले. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारे नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे."
कसा झाला अंतिम सामना
अंतिम सामना अतिशय थरारक झाला. पृथ्वीराजने योग्य संधी साधत पहिला गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. पण त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत असताना त्याला थेट रिंगणाच्या बाहेर ढकलले. यामध्ये पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळाला. अखेर वेळ संपल्याने पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरला. यानंतर त्याच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोषाला सुरुवात केली.
पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सायंकाळी उशीरा झाला. तत्पूर्वी गादी विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ अंतिम सामन्यात पोहोचला. तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला.
राड्यानंतर आले उपमुख्यमंत्री अजितदादा
शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य फेरीनंतर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचांना लाथ मारली होती. त्यामुळे मोठा राडा झाला होता. या राड्यानंतर थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थित हा थरारक अंतिम सामना पार पडला. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications