उन्हाळी खेळांच्या निम्मी गुंतवणूक हिवाळी खेळांना द्या,आम्ही इतिहास घडवू!: विश्वराज जडेजांचा निर्धार
Vishwaraj Jadeja interview : लडाखच्या गोठलेल्या गुफुक तलावाच्या काठावर, जिथे 'खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२६' चा थरार सुरू आहे, तिथे एक व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. ते म्हणजे भारताचा सर्वात वेगवान लांब पल्ल्याचा आइस-स्केटर विश्वराज जडेजा.
६५ राष्ट्रीय विक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ३०० हून अधिक शर्यतींचा अनुभव गाठीशी असलेला हा ४० वर्षीय खेळाडू केवळ एक खेळाडू नाही, तर भारतीय हिवाळी खेळांच्या उज्ज्वल भविष्याचा ध्वजधारक आहे.
गुजरातमधील एका राजघराण्यातील तिसऱ्या पिढीतील खेळाडू असलेल्या विश्वराज यांचा वारसा थेट 'हॉकीचे जादूगार' मेजर ध्यानचंद यांच्यापर्यंत पोहोचतो. 'मायखेल'शी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपला प्रवास आणि हिवाळी खेळांच्या प्रगतीवर भाष्य केले.

मुलाखतीतील काही महत्त्वाचे अंश:
प्रश्न: विश्वराज, तुमच्या या विलक्षण प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली?
विश्वराज जडेजा : मी मुळात रोलर स्केटर होतो. माझ्या रक्तातच खेळ आहे. माझे आजोबा मेजर ध्यानचंद यांच्यासोबत हॉकी खेळले आहेत, माझे वडील आणि काकू देखील उत्तम खेळाडू होते. मी पदके पाहतच मोठा झालो. रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मला जाणवले की, मला देशासाठी सर्वोच्च स्तरावर, म्हणजेच ऑलिंपिकमध्ये काहीतरी करायचे असेल, तर मला 'आइस स्केटिंग'कडे वळावे लागेल.
प्रश्न: हा निर्णय तुम्हाला थेट नेदरलँड्सला घेऊन गेला, तो अनुभव कसा होता?
विश्वराज जडेजा : ऑलिंपिक स्वप्न उराशी बाळगून मी सामान भरले आणि थेट युरोप गाठले. आज मी नेदरलँड्समध्ये जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण घेतो. मी आतापर्यंत ३१३ शर्यती खेळल्या असून ६५ राष्ट्रीय विक्रम माझ्या नावावर आहेत. एकदा मी अवघ्या 'एक चतुर्थांश सेकंदाने' ऑलिंपिकची संधी चुकवली, पण एका भारतीय खेळाडूसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची प्रेरणा कधीही संपत नाही.
प्रश्न: गुजरातसारख्या राज्यातून हिवाळी खेळांकडे वळणे हे जरा वेगळे वाटते, ते कसे शक्य झाले?
विश्वराज जडेजा : खरंय, गुजरात आणि हिवाळी खेळ यांचा संबंध सहसा लावला जात नाही. पण एकदा तुम्ही काहीतरी ठरवले की, भारतीय खेळाडूमध्ये प्रचंड जिद्द असते. आइस स्केटिंग हे रोलर स्केटिंगपेक्षा खूप वेगळे आहे, पण थोडा जरी पाठिंबा मिळाला तरी आम्ही खूप दूर जाऊ शकतो, हा विश्वास मला माझ्या कौटुंबिक वारशातून मिळाला.
प्रश्न: 'खेलो इंडिया' या व्यासपीठामुळे हिवाळी खेळांना किती फायदा झाला आहे?
विश्वराज जडेजा : खेलो इंडियाची आता सहावी आवृत्ती आहे. या उपक्रमामुळे एक मोठे व्यासपीठ तयार झाले आहे. पायाभूत सुविधा सुधारत आहेत आणि लोकांचे लक्ष या खेळांकडे वेधले जात आहे. आपण नक्कीच योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.
प्रश्न: भारताच्या हिवाळी ऑलिंपिक महत्त्वाकांक्षेबद्दल तुमचे काय मत आहे?
विश्वराज जडेजा : हिवाळी खेळांसाठी आपल्याला 'क्विक फिक्स' (तात्पुरते उपाय) नको आहेत. त्यासाठी ८ वर्षांचा दीर्घकालीन कार्यक्रम हवा आहे. जर आपण आता योग्य गुंतवणूक केली, तर ४ वर्षांत आपल्याकडे ऑलिंपिक दर्जाचे शॉर्ट-ट्रॅक स्केटर असतील आणि ८ वर्षांत आपण पदकांसाठी स्पर्धा करू शकू.
प्रश्न: भारतीय हिवाळी खेळांसाठी तुमचा शेवटचा संदेश काय असेल?
विश्वराज जडेजा : आपण एक महाकाय देश आहोत आणि बदल व्हायला वेळ लागतो, पण आता किमान योग्य प्रश्न विचारले जात आहेत. माझा एकच संदेश आहे- "उन्हाळी खेळांमध्ये (Summer Olympics) जितकी गुंतवणूक होते, त्याच्या अर्धी जरी हिवाळी खेळांना (Winter Sports) दिली, तरी आम्ही चमत्कार करून दाखवू."
विश्वराज जडेजा: एक दृष्टीक्षेप
- वारसा : मेजर ध्यानचंद यांचे सहकारी राहिलेल्या आजोबांचा नातू.
- विक्रम : ६५ राष्ट्रीय विक्रम आणि ३००+ आंतरराष्ट्रीय शर्यतींचा अनुभव.
- खास ओळख : ४,५०० मीटर उंचीवर ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर अनधिकृत जागतिक विक्रम.
- ध्येय : भारताला हिवाळी ऑलिंपिकच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणे.












Click it and Unblock the Notifications