IPL 2025: प्लेऑफमध्ये पाऊस पडला तर काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आयपीएल 2025 चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असला तरी यंदाच्या स्पर्धेत पावसाचा अडथळा वारंवार जाणवला आहे. लीग टप्प्यातील अनेक सामन्यांमध्ये हवामानाने हस्तक्षेप केला आणि त्याचे परिणाम थेट पॉइंट्स टेबलवर झाले.

आरसीबीचे काही सामने तर हवामानाच्या अंदाजामुळे बेंगळुरुऐवजी लखनऊमध्ये हलवण्यात आले. आता प्लेऑफ सामन्यांवरही पावसाचे सावट आहे. अशा वेळी एक मोठा प्रश्न उभा राहतो - जर प्लेऑफचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोण अंतिम फेरीत जाईल? आणि 'रिझर्व डे' ठेवण्यात आलाय का?
चार संघ प्लेऑफमध्ये, हवामान बनलं डोकेदुखी
२९ मेपासून प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. पंजाब किंग्ज, आरसीबी, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र हवामानामुळे सामन्यांचे स्थळ बदलावे लागले आहे आणि याच कारणावरून प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
लीग टप्प्यात काय केलं गेलं?
लीग टप्प्यात पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. त्यानंतर कट-ऑफ टाइममध्येही एक तासाची वाढ करण्यात आली. सध्या कट-ऑफ वेळ रात्री ११.५६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्लेऑफसाठी समान गुण शक्य नाही, मग...?
प्लेऑफमध्ये मात्र सामन्याचा निकाल हवा - इथे गुण वाटून चालणार नाही. त्यामुळे जर सामना पावसामुळे अपूर्ण राहिला, तर निर्णयासाठी काय प्रक्रिया असेल हे स्पष्ट असायला हवं.
आयपीएलच्या प्लेइंग कंडिशन्समध्ये असे स्पष्ट लिहिलेले नाही की प्रत्येक प्लेऑफ सामन्यासाठी 'रिझर्व डे' अनिवार्य आहे. मात्र खेळ असलेल्या दिवसाच्या अतिरिक्त वेळेशिवाय, रिझर्व डे देखील ठेवला जाऊ शकतो, असे धोरणात्मक दस्तावेजांमध्ये नमूद केले आहे.
रिझर्व डे बद्दल स्पष्टता कधी?
सध्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असले, तरी रिझर्व डे बाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच त्याबाबत स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांत प्लेऑफ सामन्यांसाठी रिझर्व डे ठेवण्यात आले आहेत आणि यंदाही तशीच शक्यता आहे.
फायनलसाठी काय नियम आहेत?
फायनलसाठी सहसा रिझर्व डे ठरवलेला असतो. जर पहिल्या दिवशी सामना पूर्ण न झाल्यास, तो पुढील दिवशी खेळवला जातो. रिझर्व डेच्याही दिवशी पावसामुळे सामना होऊ न शकल्यास, दोन्ही संघांना 'संयुक्त विजेते' घोषित करण्यात येते.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये असे 'जॉइंट विनर'चे उदाहरण घडलेले नाही, पण हवामानाचा लहरीपणा पाहता, यंदा ही शक्यता नाकारता येणार नाही.
थोडक्यात काय?
प्लेऑफमध्ये गुण वाटून निकाल लागू शकत नाही
रिझर्व डे असण्याची शक्यता, पण अजून घोषणा नाही
फायनलसाठी रिझर्व डे असतो, तरीही सामना न झाल्यास संयुक्त विजेते ठरवले जातात
कट ऑफ टाइम रात्री ११.५६ पर्यंत वाढवण्यात आला आहे
आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत हवामानाकडे. कारण यंदाचा IPL अंतिम टप्प्यात असला, तरी विजेता कोण होणार हे ठरवण्यात हवामान मोठी भूमिका बजावू शकतं.












Click it and Unblock the Notifications