मुस्तफिजूरला वगळल्याने बांगलादेशचा IPLवर 'बॅन'; T-20 विश्वचषकासाठी भारत दौऱ्यालाही नकार
Bangladesh bans IPL broadcast : भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रीडा संबंधांमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी दरी निर्माण झाली आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला डच्चू देण्यात आला.
त्यानंतर बांगलादेश सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांगलादेशने केवळ देशातील आयपीएल प्रसारणावर बंदी घातली नसून, आगामी टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यासही स्पष्ट नकार दिला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कडक निर्णय
सोमवारी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृत निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार, संपूर्ण बांगलादेशात आयपीएल सामन्यांचे प्रमोशन, थेट प्रक्षेपण आणि पुनर्प्रसारण तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आले आहे. "बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला विनाकारण लीगमधून वगळणे हे बांगलादेशी जनतेसाठी अपमानजनक आणि दुर्दैवी आहे," असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मुस्तफिजूरला का वगळले?
कोलकाता नाईट रायडर्सने ३ जानेवारी रोजी मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर केले. या निर्णयामागे क्रिकेटपेक्षा राजकीय आणि सामाजिक कारणे अधिक असल्याची चर्चा आहे.
हिंदूंवरील हिंसाचाराचे पडसाद
बांगलादेशात गेल्या १६ दिवसांत ४ हिंदूंची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतातून मुस्तफिजूरला आयपीएलमधून हटवण्याची मागणी जोर धरत होती.
बीसीसीआयचा हस्तक्षेप
सूत्रांनुसार, बीसीसीआयने केकेआर व्यवस्थापनाला मुस्तफिजूरला संघातून कमी करण्याचे आदेश दिले होते, ज्याची अंमलबजावणी झाल्यानंतर बांगलादेश सरकार संतापले आहे.
सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी
आयपीएलवरील बंदीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ५ जानेवारी रोजी बीसीबीने जाहीर केले की, आगामी टी-२० विश्वचषकासाठी ते आपला संघ भारतात पाठवणार नाहीत.
बीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला विनंती केली आहे की, बांगलादेशचे सर्व सामने भारतातून हलवून श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत.
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल?
पाकिस्तानने यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार देत आपले सामने श्रीलंकेत हलवले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामनाही आता कोलंबोमध्ये होण्याची शक्यता आहे. आता बांगलादेशनेही हीच भूमिका घेतल्यामुळे आयसीसीसमोर या मेगा इव्हेंटच्या नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी!
या वादाचा सर्वाधिक फटका क्रिकेट चाहत्यांना बसणार आहे. बांगलादेशात आयपीएलचे मोठे प्रेक्षकवर्ग आहेत, जे आता या स्टार-स्टडेड लीगला मुकणार आहेत. दुसरीकडे, राजकीय तणावाचा परिणाम खेळावर होत असल्याने क्रीडाप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. आता आयसीसी या वादात मध्यस्थी करणार की बांगलादेश आणि पाकिस्तानच्या दबावापुढे झुकून विश्वचषकाचे वेळापत्रक बदलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications