Aavishkar Awards 2026 : उद्योजकतेचा सन्मान करण्यासाठी शहर सज्ज
पुणे : शहरातील एखाद्या मोठ्या सोहळ्यापूर्वीची एक वेगळीच शांतता असते. या आठवड्यात पुणेही त्याच शांत, उत्सुक वातावरणात दिसत आहे. आता उलटगणती काही दिवसांवर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी 'सीविक मिरर' आणि 'पुणे टाइम्स मिरर' यांच्या वतीने आयोजित 'आविष्कार लीडरशिप अवॉर्ड्स २०२६'चा शानदार सोहळा रंगणार आहे. उद्योजकतेच्या विविध रूपांचा सन्मान आणि गौरव करणे, हा या पुरस्कार सोहळ्यामागचा मुख्य हेतू आहे.
महत्त्वाकांक्षेचा एखादा एकच प्रकार, यशाची एखादी विशिष्ट व्याख्या किंवा उद्योगाची एखादीच शाखा या पुरस्कारांपुरती मर्यादित नाही. कल्पना सुचल्यापासून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे संस्थापक, नवनवीन प्रयोग करणारे उद्योजक, वडिलोपार्जित व्यवसायाची सूत्रे हाती घेऊन त्याला नव्या दिशेने नेणारी दुसरी पिढी आणि केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर एखादी कल्पना स्वस्थ बसू देत नाही म्हणून तिच्या मागे धावणारे उद्योजक - या सगळ्यांच्या उद्योजकीय प्रवासाचा येथे गौरव होणार आहे.

पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. पुण्यातील व्यावसायिक वर्तुळात या सोहळ्याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे १३ ऑगस्ट ही तारीख आता केवळ दिनदर्शिकेवरील एक नोंद राहिलेली नसून, एका महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या आगमनाची चाहूल देत आहे.
या अर्थाने 'आविष्कार लीडरशिप अवॉर्ड्स' हा केवळ पुरस्कार सोहळा नसून एक आरसाच आहे- ज्यात पुणे एकदा स्वतःच्या उद्योजकीय चेहऱ्याकडे पाहत आहे आणि त्याला अभिमानाने स्वीकारत आहे. कारण या सोहळ्यात उद्योजकता हा केवळ कथेचा एक भाग नसेल; तीच या संपूर्ण सोहळ्याची मध्यवर्ती भूमिका असेल.
मंच सजलेला आहे, तारीख जवळ आल्यामुळे उत्सुकता...
१३ ऑगस्टला या मंचावर नेमके कोणकोणते उद्योजक आणि मान्यवर दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र मंच सज्ज आहे, तारीख जवळ आली आहे आणि या सोहळ्यामागचा उद्देश स्पष्ट आहे.
उद्योजकतेच्या प्रत्येक वास्तववादी, संघर्षमय आणि चिकाटीच्या रूपाला तो सन्मान मिळवून देणे, ज्याची ती दीर्घकाळापासून पात्र आहे. कधीकाळी कागदाच्या तुकड्यावर लिहिलेली एखादी कल्पना, जगण्याच्या आणि यशाच्या प्रत्येक व्यवहार्य समीकरणाला आव्हान देत प्रत्यक्षात आणलेली एक धाडसी पैज; या सगळ्यांना एका संध्याकाळसाठी तेवढाच मान मिळणार आहे, जेवढा तो मिळायला हवा.
उद्योजकतेच्या नव्या पर्वात पुण्याची महत्त्वाची भूमिका...
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची 'Building Tomorrow: Innovation, Enterprise & the Future of India' ही संकल्पना आहे. ही केवळ सजावटीची ओळ नाही, तर देशातील सध्याच्या उद्योजकीय वातावरणाचे प्रतिबिंब आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील उद्योजकांनी इतरांच्या टेबलावर आपल्यासाठी जागा मागण्याऐवजी स्वतःचे टेबल उभारण्यास सुरुवात केली आहे. चिकाटीने, टप्प्याटप्प्याने आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून. पुणेही याला अपवाद नाही. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेबद्दल फारसा गाजावाजा न करता, उद्योजकतेच्या या नव्या पर्वात पुणे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
व्यवसाय टिकवायचा असेल तर बदल आवश्यक...
'आविष्कार अवॉर्ड्स'चे वैशिष्ट्य केवळ पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींच्या यादीत नाही, तर कशा प्रकारच्या यशाचा सन्मान केला जातो, यात आहे. हा सोहळा केवळ झगमगत्या बोर्डरूममधील यशापुरता मर्यादित नाही. एका नवउद्योजकाने तीन सादरीकरणे केली, दोनदा नकार मिळाला आणि त्यानंतर मिळवलेले पहिले मोठे यश असो किंवा कुटुंबाचा व्यवसाय उभा करणाऱ्या वडिलांना, 'आपला व्यवसाय टिकवायचा असेल तर आता त्यात बदल करणे आवश्यक आहे,' हे पटवून देणारी तिसरी पिढी असो; या सगळ्यांना येथे स्थान आहे.
संघर्षांवर उभी उद्योजकतेची संपूर्ण कहाणी...
हे उद्योजकतेच्या विकासकथेतील केवळ छोटे संदर्भ नाहीत. उलट, याच संघर्षांवर उद्योजकतेची संपूर्ण कहाणी उभी आहे. कागदाच्या तुकड्यावर लिहिलेल्या कल्पनेपासून कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या, उत्पादनांची निर्यात करणाऱ्या आणि अनेक वर्षे टिकून राहणाऱ्या उद्योगापर्यंतचा हा प्रवास आहे. या संकल्पनेत एक प्रकारचे चित्रपटासारखे आकर्षण आहे. वर्षानुवर्षे प्रकाशझोतात न आलेल्या संघर्षांना एका संध्याकाळसाठी औपचारिक मान्यता देणारे हे व्यासपीठ आहे. अपयशी ठरलेले प्रयोग, कठीण काळात छोट्या कार्यशाळेला चालना देण्यासाठी घेतलेली कर्जे, अनेकदा निष्फळ ठरलेल्या बैठका आणि अचानक मिळालेले एखादे महत्त्वाचे यश; उद्योजकतेच्या या प्रवासातील हे सगळे टप्पे आहेत.
पुण्याच्या उद्योजकीय ऊर्जेची पद्धतशीर वाटचाल...
पुण्यात अशा जिद्दीची कधीच कमतरता नव्हती. मात्र, या जिद्दीला योग्य तो सन्मान देण्यासाठी एखाद्या भव्य व्यासपीठाची गरज होती. या ऑगस्टमध्ये ते व्यासपीठ पुण्याला मिळणार आहे. मुंबईची आर्थिक ताकद किंवा बंगळुरूची स्टार्टअपची झळाळी यांच्याशी पुण्याची अनेकदा तुलना केली जाते. अशा वेळी 'आविष्कार अवॉर्ड्स'सारखे सोहळे एक वेगळा दृष्टिकोन समोर आणतात. पुण्याच्या उद्योजकीय ऊर्जेला स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी कधीही मोठा गाजावाजा करण्याची गरज भासलेली नाही. उत्पादन क्षेत्रापासून फिनटेकपर्यंत आणि ऑनलाइन फारशी चर्चा न होणाऱ्या, मात्र स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार बनलेल्या कौटुंबिक उद्योगांपर्यंत पुण्याने सातत्याने आणि पद्धतशीरपणे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.


Click it and Unblock the Notifications