काँग्रेसशी गद्दारी! बदमाश यावेळी सापळ्यात, निवडणुकीत फुटलेल्या आमदारांची नावे दिल्लीला पाठवली
मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतफुटीचा दगाफटका झाला. गद्दारी करणाऱ्या या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पटोले यांनी या फुटीर आमदारांसाठी 'बदमाश' हा शब्द वापरला आहे.
'त्या' आमदारांमुळे मविआला फटका
12 जुलैच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदाराचा मोठा दगाफटका झाला. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्ताधारी महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीचे केवळ 2 उमेदवार निवडून आले व एकाचा पराभव झाला. दगाफटका झाल्यानेच हा प्रकार घडला.

'बदमाश' सापळ्यात अडकले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी बोलताना गेल्यावेळी सुटलेल्या बदमाशांना यावेळी सापळा रचून पकडण्यात आल्याचे स्पष्ट केले. भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या आमदारांनी मतदान केले. दगाफटका करणाऱ्या त्या आमदारांवर कठोर कारवाई करण्याचेही संकेत पटोले यांनी दिले.
विधानपरिषदेच्या गेल्या निवडणुकीतही काही बदमाशांनी बदमाशी केली होती. तेव्हा त्यांना पकडता आले नव्हते. पण यंदा त्यांना पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला होता. त्यात ते सापडलेत, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
फुटीरांची पाठवली पक्षश्रेष्ठींकडे
काँग्रेसचे आमदारांनी पक्षाऐवजी दुसऱ्याच उमेदवारांना मत दिल्याचे दिसत आहे. या फुटीर आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांची नावे दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत.
अशी मते फुटली...
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे एकूण 69 मते होती. त्यात काँग्रेसच्या 37, ठाकरेंच्या 15 व शरद पवारांच्या 12 मतांसह शेकापच्या 1, सपच्या 2 तथा माकप व अपक्षाच्या प्रत्येकी एका मताचा समावेश होता. पण महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर व जयंत पाटील या 3 उमेदवारांना पहिल्या पसंतीची केवळ 59 मते मिळाली. यात काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 25 मते मिळाली. याचा अर्थ काँग्रेसचे उर्वरित मते फुटली हे स्पष्ट आहे.
नार्वेकरांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची 7 मते
दुसरीकडे, शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाची 12 मते पडली आहेत. नार्वेकरांना ठाकरे गटाची 15 व काँग्रेसची शिल्लक मते मिळाली. त्यांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची 7 मते मिळाली. उर्वरित मते महायुतीला मिळाली.












Click it and Unblock the Notifications