पेपर फुटी प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबईः स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी १ जुलै) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे, आशिष शेलार, भास्कर जाधव, अनिल देशमुख, प्रकाश आबिटकर, रोहित पवार यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

गट 'क' च्या जागा एमपीएससीमार्फत भरणार
उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, दोन वर्षात एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी या शासनाने केली आहे. शासनाने 75 हजार पदे भरतीची घोषणा केली होती. त्यापैकी 57 हजार 452 जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत, तर 19 हजार 853 जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे.
31 हजार 201 पदांसाठी भरतीची कार्यवाही सुरु आहे. या पुढील काळात निरंतर भरती प्रक्रिया सुरू राहील. गट 'क' वर्गाच्या जागा टप्प्याटप्प्याने एमपीएससीकडे वर्ग करण्यात येणार आहेत. गट 'क' वर्गाच्या रिक्त पदांची भरती यापुढे एम.पी.एस.सी मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत राजपत्रित पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेर परीक्षा घेण्याबाबत व या परीक्षेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मृद व जलसंधारण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. सदर परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएसतर्फे होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'गेम झोन' मधील वीज पुरवठ्याची व्यवस्था तपासणार: फडणवीस
राज्यात बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी मोठी प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच काही शहरांमध्ये 'गेम झोन' आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामध्ये वीज पुरवठ्याबाबत परवानगीचाही समावेश असतो.
प्रदर्शनांची ठिकाणे, गेम झोन आदी ठिकाणी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या व्यवस्थेची महावितरणमार्फत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कात्रज (जि. पुणे) येथे फोरेन सिटी प्रदर्शनात आयोजनातील त्रुटीमुळे एका मुलाचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत सदस्य राहुल कूल यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार आशिष जयस्वाल, योगेश सागर, प्राजक्त तनपुरे यांनीही सहभाग घेतला.












Click it and Unblock the Notifications