'लाडकी बहीण' की 'महालक्ष्मी' पावणार कोण..? गेल्यावेळची स्थिती व यंदाचे एक्झिट पोल काय सांगताहेत?
Exit Poll Result for Maharashtra- गेल्यावेळीच्या विधानसभेला म्हणजेच 2019 ला भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यावेळी लाडक्या बहिणींनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोल व्यक्त करत आहेत. मात्र महाविकास आघाडीनेही तुल्यबल लढत दिली असून, अनेकांनी या दोन्ही पक्षांतील अंतर एकदम कमी दाखवले आहे. त्यामुळे यंदा नेमकी कुणाची सत्ता येईल, याबाबत अनेक तर्क लढवले जात आहे.

काय झाले होते गेल्या विधानसभेला
गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या होत्या. मात्र 145 ची मॅजिक फिगर गाठण्यात भाजपला अपयश आलं होतं. गेल्यावेळी अखंड असलेली शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिली होती. अखंड राष्ट्रवादीनेही कांटे की टक्कर देत 54 जागा पदरात पाडल्या होत्या. काँग्रेसने तब्बल 44 जागा खिशात घालत अचानक चमत्कार दाखवला होता.
गेल्यावेळी होते 13 अपक्ष आमदार
गेल्या निवडणुकीत बंडखोर आणि अपक्षांचा बोलबाला राहिला होता. तब्बल 13 अपक्ष आमदारांनी विधीमंडळ गाठलं होतं. हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'ला 3 जागा मिळाल्या आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन जागांवर यश मिळालं होतं. राज ठाकरे यांच्या मनसेला जेमतेम भोपळा फोडता आला. मनसेची एक जागा निवडून आली होती. तर माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांनी एक-एक जागा जिंकली होती.
गेल्यावेळी रंगले होते सत्तानाट्य
गेल्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने मंत्रीमंडळ स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, या दोघांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युतीनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अंतर्गत सत्तांतर झालं.
यावेळी काय सांगतात एक्झिट पोल
यावेळी अनेक एक्झिट पोलनुसार पुन्हा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अनेक पोलने महाविकास आघाडीलाही महायुतीच्या अगदी जवळ दाखवलं आहे. त्यामुळे सध्यातरी एकाच कोणत्याही युती किंवा आघाडीला कौल देता येणार नाही. दुसरीकडे एक्झिट पोलचा इतिहास पाहता, त्यावर किती विश्वास ठेवावा, हाही प्रश्न आहे. गेल्यावेळी झालेले सत्तानाट्य यावेळी होऊ नये, एवढीत जनतेची अपेक्षा असणार आहे.












Click it and Unblock the Notifications