Video:वाशिममध्ये संतापजनक प्रकार!अनुदानाची विचारणा करताच शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची बुटाने मारहाण
Washim Agriculture Officer Assault : "बळीराजा" म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक देण्याऐवजी एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने चक्क बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात समोर आली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोगरी येथील ऋषिकेश पवार या तरुण शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर शेतात मनरेगा (MGNREGA) योजनेंतर्गत संत्री फळबागेची लागवड केली होती. या फळबागेसाठी मिळणारे शासकीय अनुदान गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले होते. मंगळवारी मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे पथकासह परिसरात पाहणीसाठी आले असता, ऋषिकेश पवार यांनी त्यांना रखडलेल्या अनुदानाबद्दल विचारणा केली.
वाशिममध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषी अधिकाऱ्यांचा प्रताप; राज्यभरात संताप #viralvideo #Washimnews pic.twitter.com/weNAHKpgA1
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 14, 2026
संयमाचा बांध सुटला आणि वाद चिघळला
अनुदानाबाबत चर्चा सुरू असताना शेतकरी ऋषिकेश पवार या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते. यामुळे संतापलेल्या तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचा संयम सुटला. आरोपानुसार, कांबळे यांनी थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात पायातील बुटाने त्यांना मारहाण केली. इतकेच नव्हे, तर शेतातील मातीची ढेकळे उचलूनही शेतकऱ्याला मारल्याचा दावा केला जात आहे. या मारहाणीदरम्यान "तुला गुन्ह्यात अडकवीन," अशी धमकीही अधिकाऱ्याने दिल्याचे पीडित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील वादाची पार्श्वभूमी
हा वाद केवळ एका दिवसाचा नव्हता. गोगरी, हिरंगी, खेर्डा या भागातील सुमारे १५ फळबाग उत्पादक शेतकरी रोजगार हमी योजनेच्या लाभापासून वंचित होते. यासंदर्भात ऋषिकेश पवार यांनी यापूर्वीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. प्रलंबित गट तत्काळ मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता. याच दबावापोटी अधिकारी पाहणीसाठी आले होते, मात्र त्याचे रूपांतर हिंसक वादात झाले.
शेतकरी संघटना आक्रमक
या घटनेचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे सरकारी अधिकारी शेतकऱ्याला बुटाने मारहाण करत असतील, तर हे सहन केले जाणार नाही, असा इशारा संघटनांनी दिला आहे. दोषी अधिकाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
प्रकरण पोलिसांत, पण अखेर सामोपचार
मारहाणीच्या या प्रकारानंतर हे प्रकरण मंगरुळपीर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी चर्चेनंतर हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले आहे. जरी हे प्रकरण कायदेशीररीत्या मिटले असले, तरी एका शासकीय अधिकाऱ्याची ही मुजोरी प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.












Click it and Unblock the Notifications