वैष्णवी हगवणे प्रकरण : “अजितदादा, पदाधिकाऱ्याला वाचवणार की न्याय देणार?” सुषमा अंधारे यांचा सवाल
पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १६ मे रोजी वैष्णवीने गळफास लावून आपले जीवन संपवल्याचे समोर आले. मात्र, तिच्या कुटुंबियांचा दावा आहे की, ही आत्महत्या नसून छळाच्या घटनांमुळे झालेली हत्या आहे.

सासरकडील छळामुळे जीवन संपवलं?
वैष्णवीच्या सासरच्यांकडून सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. कुटुंबियांनी सांगितले की, जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आणावेत म्हणून तिच्यावर दबाव टाकला जात होता. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्या आहेत.
वैष्णवीच्या काकांनी सांगितले की, १६ मे रोजी तिला टॉर्चर करण्यात आले, त्यानंतर काही जणी घरातून बाहेर गेल्या आणि परत आल्यानंतर पुन्हा तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हे सर्व सहन न झाल्याने वैष्णवीने गळफास घेतला, असा त्यांचा आरोप आहे.
सुषमा अंधारे यांचा थेट अजित पवारांना सवाल
या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे. "मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना अटक कधी होणार? अजितदादा, तुम्ही सत्ताधारी म्हणून तुमच्या पक्षाच्या नेत्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीसाठी न्याय मिळवून देणार?" असा रोषपूर्ण सवाल त्यांनी केला आहे.
जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार ?
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 21, 2025
अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? pic.twitter.com/bTRGQk3PgW
शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?
ससून रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनातही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांनी तयार केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले की, वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. शिवाय तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा तसेच रक्त गोठल्याचे डागही आढळले आहेत.
या अहवालानंतर वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली? - हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications