मोहोळमधील 'पंडित देशमुख हत्याकांडा'वरून राजकीय वादळ;बाळराजे पाटलाला फाशी द्या; नेमकं प्रकरण काय?
Umesh Patil Targets Balraje Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मोहोळमधील बहुचर्चित पंडित देशमुख हत्याकांड प्रकरणावरून थेट माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. दहशत आणि गुंडगिरी संपवण्यासाठी बाळराजे पाटलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.
निर्घृण हत्येचे गंभीर आरोप
उमेश पाटील यांनी दावा केला आहे की, मोहोळमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित देशमुख यांची हत्या संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे करण्यात आली होती. त्यांनी हत्येची क्रूरता सांगताना अत्यंत धक्कादायक विधान केले: "पंडित देशमुखचा मर्डर या बाळराजे पाटलाने केला. त्यांचे हातपाय तोडले, गळा कापला, जीभ कापली, एवढंच नाही तर विकृत बाळराजे पाटलाने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली, या प्रकरणात बाळराजे पाटील मुख्य आरोपी होता, मात्र इतर १३ आरोपींसह त्याला न्यायालयातून निर्दोष सोडण्यात आले होते.

साक्षीदार फोडण्याचा अन् यंत्रणा मॅनेज करण्याचा आरोप
उमेश पाटील यांनी या खटल्यातून आरोपी निर्दोष सुटण्यामागे मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली होती, ते न्यायालयात फुटले. या साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले आहेत, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.
सरकारी अपील
सरकारी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेले अपील २० वर्षांत कोर्टाच्या बोर्डावर आले नाही. "यामुळे यामध्ये नेमकं सरकारी यंत्रणेतील कोण मॅनेज झालंय का? हे तपासावं," अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबदारी: फाशीची मागणी
उमेश पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबद्दल "चुकीला माफी नाही, याचा बदला घेतला जाईल" असे सांगितल्याचे स्पष्ट केले. उमेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. "आमची एकट्याची नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे की, दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे."
हरिष साळवी लढवणार केस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवी ही केस लढवतील, याची जबाबदारी घेतल्याचे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले. न्यायालयीन मार्गाने पंडित देशमुख यांच्या हत्येचा बदला घेतल्यानंतरच मोहोळ तालुक्याला न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
पाटीलकी' गुंडाळून ठेवली
या प्रकरणाच्या वेळची परिस्थिती स्पष्ट करताना उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्या वडिलांवर निशाणा साधला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. आर. पाटील गृहमंत्री होते. "आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटीलकी गुंडाळून घरी ठेवत गेले होते. हाच तो बाळराजे आहे," असे सांगत उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्या कुटुंबाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे सांगितले.
पंडित देशमुख हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले असून, उमेश पाटील यांच्या थेट आरोपांमुळे आणि फाशीच्या मागणीमुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यावर झालेल्या आरोपांमुळे या प्रकरणाची पुढील वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications