उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेसचा टोला, तर शरद पवारांचा सावध पवित्रा; मविआ फुटेल?
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त, उद्धव ठाकरेंनी गुरुवारी अंधेरीत दिलेलं भाषण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या भाषणात उद्धव ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा मानस व्यक्त केला. ठाकरे यांच्या या भाषणानंतर मात्र आज नाना पटोले व शरद पवारांनी वेगवेगळी भूमिका मांडली. पटोलेंनी ठाकरेंच्या भुमिकेचे स्वागत केले, तर पवारांनीही मत व्यक्त केलं. हे सगळं पाहता आगामी काळात महाविकास आघाडी खरंच टिकेल का, हा प्रश्न आहे.

काय म्हणाले होते ठाकरे?
अंधेरीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना तुम्ही उचलून आपटणार असाल, सूड उगवणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मी एकट्याने लढेल. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईल, असं म्हणत ठाकरे यांनी स्वबळाचा संकेत दिला होता.
काय म्हणाले नाना पटोले?
त्यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या घोषणेचे स्वागत आहे. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. प्रत्येक प्रमुखाला पक्षाचे धोरण ठरविण्याचा अधिकार असतो. त्यानुसार ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा जाहीर होतील, तेव्हा आम्हीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनाही पत्रकारांनी याच प्रश्नावर छेडले. त्यावर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण दोन्ही पक्षांनी केले. मात्र उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला जास्त लोक होते. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात स्वबळाच्या विषयासह इतर विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी भाष्य केले. ते त्यांचे मत आहे. मात्र त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही.
मविआत बिघाडी होणार?
महाविकास आघाडीतील ठाकरे गट व काँग्रेसमध्ये यापूर्वीही वाद झाले आहेत. मविआतील तिन्ही पक्षांतील धुसफूस वारंवार समोर येत आहे. आता उद्धव ठाकरे व त्यापूर्वी संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मविआतील वाद जास्त वाढणार आहे. या तिन्ही पक्षांतील संबंध जास्त ताणणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचा स्वबळाचा नारा कायम राहिला तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तुटणार आहे.












Click it and Unblock the Notifications