'जानवं घालाल अन् मुंबई अदानीच्या घशात टाकाल...; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतसह भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Dussehra speech 2025 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना अनेक परखड प्रश्न विचारत भाजप आणि त्यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर मुंबईला अदानीच्या घशात घालण्याचा आरोप केला, तसेच भागवत यांच्या 'प्रत्येक भारतीय हिंदू आहे' या वक्तव्याचा दाखला देत भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभे केले.

मोहन भागवत यांना थेट प्रश्न आणि भाजपवर टीका
उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीवर अनेक प्रश्न केले. 'तुम्हाला समाधान आहे का?': "संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का, लाज-लज्जा-श्रम आहे का नाही? आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसे ही वागत आहेत," अशा कठोर शब्दांत त्यांनी संघ रचनेवर चालणाऱ्या भाजपच्या कार्यशैलीवर टीका केली.
हिंदू-मुस्लिम राजकारण
मोहन भागवत यांनी 'या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे' असे वक्तव्य केले असताना, "मग भाजपवाले हिंदू-मुस्लिम का करत आहेत?" असा थेट सवाल ठाकरे यांनी केला.
धर्मांध राजकारणावर टीका
त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर निशाणा साधला. "काहीतरी एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचे, तुम्ही हिंदू तरी आहात की नाही, हे एकदा चेक करून घ्या."
मुंबई आणि 'भगवा' शिवसेनेचाच
उद्धव ठाकरे यांनी भाजप मुंबईवर कब्जा करू शकत नाही, असा ठाम दावा केला. "भाजप मुंबई जिंकूच शकत नाही, हे लोक मुंबई अदानीच्या पायी घालतील," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शिवसेनेच्या अस्मितेचा मुद्दा मांडताना ते म्हणाले, "जानवं घालाल अन् मुंबई... भगवा हा शिवसेनेचाच आहे, तुमचं फडकं काढा," अशा शब्दांत त्यांनी भाजपला आव्हान दिले.
देशभक्ती आणि घराणेशाहीवर स्पष्ट भूमिका
ठाकरे यांनी भाजपला देशभक्ती शिकवण्यावरून फटकारले, तसेच आपल्या ठाकरे घराणेशाहीचा अभिमान असल्याचे सांगितले.
देशप्रेम आम्हाला शिकवता?
"देशप्रेम आम्हाला शिकवता. क्रिकेट आणि पाकिस्तानसोबत, कशाला थोतांड मांडले," असा सवाल त्यांनी करत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केला.
'हिंदू सुरक्षित नाही': "धर्म विचारून गोळ्या घातल्या, हिंदू सुरक्षित नाही," असे म्हणत त्यांनी देशातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
ठाकरेंच्या घराणेशाहीचा अभिमान: "बाप देशप्रेमाचे (शिकवतात)... ठाकरेंच्या घराणेशाहीचा अभिमान आहे," असे ठामपणे सांगत त्यांनी घराणेशाहीवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
मणिपूरचा आगडोंब, मुंबईची दैना आणि भाजपचा 'अमिबा' कारभार : ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी मणिपूरमधील हिंसाचार, मुंबईच्या समस्या, भाजपचे 'पगारी मतदार' तयार करण्याचे धोरण आणि संघाच्या १०० वर्षांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मणिपूरच्या आगीवर भाष्य; मोदींचे मौन आणि 'एकपेशीय प्राणी' भाजप
उद्धव ठाकरे यांनी मणिपूरमधील गंभीर परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "तीन वर्ष मणिपूर जळत आहे. आम्हाला वाटले होते मोदी काहीतरी तोडगा काढतील, पण त्यांचे भाषण ऐकून हसावे की रडावे कळालेच नाही." मणिपूरच्या नावातच 'मणी' आहे, पण तिथली जनता आक्रोश करत असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले, असे ते म्हणाले.
भाजपच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी भाजपची तुलना थेट 'अमिबा'शी केली. "भाजप म्हणजे एकपेशीय प्राणी झाला आहे, वेडावाकडा कसाही वाढतो, कोणासोबतही युती करायची म्हणून त्यांना अमिबा म्हणतोय."
देवेंद्र फडणवीस यांच्यावर सवाल: 'लाडके मुख्यमंत्री' आणि भ्रष्टाचारावर मौन
इंडिया टूडेने केलेल्या सर्वेक्षणात देवेंद्र फडणवीस यांचे नाव भारतातील लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर असल्यावरून ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. "त्यांनी काय केले आहे?" असा सवाल करत त्यांनी फडणवीस यांच्या कार्यशैलीवर टीका केली.
"एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले गेले, अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे, पण त्यांच्या मंत्र्यांना पकडू शकत नाहीत."
"पुरावे सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडून देत आहेत. हा तुमचा कारभार?" ठाकरे यांनी भाजपला निवडणुका घेण्याचे थेट आव्हान दिले. "निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघत आहे."
मुंबईचे दुखणे आणि 'पगारी मतदारां'चा मुद्दा
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर टीका केली. "जरा कुठे पाऊस झाला की मुंबई तुंबते. खड्डे वाढत आहेत आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून दिल्लीत जात आहेत."
मुंबईची अस्मिता
"मुंबई महापालिका हे जिंकूच शकत नाही. ते व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहेत, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो."
भाजपचा झेंडा
त्यांनी भाजपच्या झेंड्यावरही टीका केली. "तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आम्हाला बोला. झेंडा कसला, फडकं आहे ते."
'पगारी मतदार' तयार करण्याची भाजपची खेळी?
शेतकऱ्यांचे कर्ज आणि महिलांच्या खात्यात टाकलेल्या पैशांवरून ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. "निवडणूक आल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे टाकले गेले. ही जी भाजप आहे न ही पगारी मतदार तयार करत आहे. हे आता तमाम जनतेने व महिला वर्गाने ठरवायचे आहे, यांचे पगारी मतदार व्हायचे आहे का?"
मोहन भागवत यांना कडक सवाल आणि हिंदुत्वावर टीका
उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना पुन्हा लक्ष्य करत संघाच्या 100 वर्षांच्या प्रयत्नांवर भाष्य केले. ठाकरे म्हणाले की, "मोहन भागवत यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही समाधानी आहात का? ज्या कामासाठी संघाने शंभर वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला लागलेली विषारी फळे यावर तुम्ही समाधानी आहात का?" "भागवत साहेबांना सांगता येत नसेल पण संघाचे हेतू ब्रह्मदेवचा बाप व्हायचा असेल तर (संघ) ब्रह्मराक्षस झाले आहे."
हिंदुत्वावर दुटप्पी भूमिका
मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठका घेतल्या आणि मशिदींना भेट दिल्यावर त्यांना 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केला गेला, यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. "आहे का भाजपकडे हिंमत मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची? लाज आहे की नाही?"
बाळासाहेबांनी पेटवलेली ही ठिणगी हा पाऊस विझवू शकत नाही - संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्या सर्वांकडे लक्ष आहे. त्यांनी पेटवलेली ठिणगी हा पाऊस विझवू शकत नाही. पाऊस वादळ असताना हा मेळावा आपण करत आहोत आणि हजारोंच्या संख्येने आपण इथे जमले आहात. हे शिवतीर्थ आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलेच मानले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून भाष्य केले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केले म्हणाले शिवतीर्थवर चिखल आहे म्हणजे तुम्ही चिखल फेकच करणार. म्हणले हो, आम्ही गद्दारांवर चिखलफेकच करणार. आज रावणाचा अंत करायचा आहे. या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतील रावणाला जाळायचा. आपल्याकडे शस्त्र पूजन झाले, गद्दारांच्या सभेत ते काय पूजणार? असा प्रश्न मला विचारला, मी म्हटलं त्यांनी दिललीवरून अमित शहा यांचे जोडे आणले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली.
सरकारला लाज वाटली पाहिजे, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या- अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले, जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या सगळ्यात सरकार नुसत्या घोषणेत बसले आहे. घोषणेचे पलीकडे हे सरकार काही करत नाही. सरकारला लाज वाटली पाहिजे, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. ही काही अभिमानची बाब नाही. हे सरकार उघड्या डोळ्याने या आत्महत्या बघत आहे. परवा संभाजीनगरमध्ये एक मोर्चा झाला, त्यात शेतकऱ्यांचा संताप इतका होता की विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ते घुसले. एक दिवस हेच शेतकरी मंत्रालयात सुद्धा घुसतील.
आज पंजाब सारखे राज्य शेतकऱ्यांना मदत जाहीर करत आहे. एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. अनेकांचे गाय गेले, बैल गेले, एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 3 प्राण्यांना मदत मिळू शकते. एका शेतकारीच्या 27 गाय वाहून गेल्या आहेत. त्यांना मदत काय मिळणार? सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती मदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही मदत फक्त 1339 कोटींची आहे, 2200 कोटींची नाही. हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. हे सरकार आल्यापासून ज्या काही घटना घडल्या त्याच्या अजून मदत नाही मिळाल्या.
अंबादास दानवे पुढे म्हणाले, जे लोक भाजपमध्ये गेले त्यांना सरळ कर्ज देण्यात आले. त्यात आमदार थोपटे, विखे पाटील यांच्या कारखान्याला कर्ज दिले गेले आहे. शेतकऱ्याची थकहमी तुम्ही घेऊ शकत नाही, पण अशा लोकांना थकहमी दिली जात आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकविमा आधी दिला जात होता, आता तो बंद करण्यात आला आहे. पिकविम्याचे निकष शिथिल झाले पाहिजे. यात बदल झाला पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्याला लढा द्यायचा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहिराती करतात आणि नंतर सांगतात ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही. त्यांचे पत्र काल उद्धव ठाकरे यांनी दाखवले होते. त्यांनी लिहिले होते, परतीच्या पावसाने जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई मिळावी. नुकसांनीची व्यापकता पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा. आता तुम्ही काय करत आहात? ओला दुष्काळ ही संकल्पना नाही म्हणता. येणाऱ्या काळात शिवसेनेला लढावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी आणि मी शंभर टक्के सांगतो हा दसरा मेळावा झाल्यानंतर शिवसेना हा लढा उभा करणार आहे. शेतकरी या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन










Click it and Unblock the Notifications