शिर्डी हादरली..! पहाटे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला, दोघांचा मृत्यू, एक गंभीर
जगप्रसिद्ध देवस्थान असलेले शिर्डी आज पहाटेच हादरले. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

नेमके काय घडले?
साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. साई संस्थानचे हे दोन कर्मचारी पहाटे कामावर येत असताना हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते. या तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली. मृत सुभाष साहेबराव घोडे या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला झाला. तर मृत नितीन कुष्णा शेजुळ या साई संस्थान कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला झाला. तिसऱ्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्णानगर परिसरात हल्ला झाला.
हल्ल्यानंतर शंका वाढल्या
साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं, हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. हा हल्ला ठरवून झाला की आरोपी मनोरुग्ण होता, हे समोर आलेले नाही. शिर्डीत एकाच रात्रीत तिघांवर चाकूने वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची चर्चा होत आहे. पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुजय विखेंची तातडीने भेट
दरम्यान, या घटनेनंतर माजी खा. सुजय विखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. याबाबत मीडियाशी प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की, मोफत अन्नछत्राने गुन्हेगारी वाढली आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आम्ही जे बोललो होतो, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते महाराष्ट्राला आत्ता कळेल. हे ठरवून केलेले मर्डर वाटत नाहीत. नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर आहेत. व्हाईटनरची नशा करणाऱ्याने हे केले असावे. वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याच्यावर हल्ला करुन त्याच्याकडून पैसे काढण्याचं हे कृत्य आहे. यात जातपातीचा विषय नाही. हे नशेखोरांचे कृत्य आहे.
पोलिसांनी उचलली पावले
सुजय विखे पुढे म्हणाले, दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील. साडेपाचला पोलिस कर्मचाऱ्यांना फोन केला, त्या कर्माचाऱ्याने तो अपघात असल्याचं सांगितलं, त्याला सस्पेंड केलं जाईल. त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही. सीसीटीव्ही तपासू, ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई होईल. आज तपास यंत्रणेला वेळ द्यावा, असंही सुजय विखे म्हणाले. आता अँक्शन मोडवर काम करावे लागेल. प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावे लागेल. आम्ही ते करून घेणार, सर्वांनी एकत्र यावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications