Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाह कधी, मुहूर्त कधी?; कसा साजरा केला जातो तुळशी विवाह, जाणून घ्या सर्व
Tulsi Vivah Time, Muhurat, Pooja Vidhi : तुळशी या औषधी वनस्पतीला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीचं नातं थेट देवांशी आणि मानवांशी जोडलं गेलेल आहे. तुळशी विवाह झाल्याशिवाय कोणत्याही शुभमंगल कार्याला प्रारंभ केला जात नाही. दरम्यान, यंदाचा तुळशीविवाह सोहळा नेमका कधी आहे, त्याचा मुहूर्त काय आहे आणि तुळशीविवाह कसा साजरा केला जातो, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत...!
अशी आख्यायिका आहे की, तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्या समर्पण करणे. तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज भगवान विष्णूंना / कृष्णांना तुळशीचे एक पान वहावे, असं सांगितले जाते.
तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास महिलांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान देखील ठेवले जाते, एवढं महत्त्व तुळशीला मानवी जीवनात आहे.

तुळशी विवाह नेमका कधी?
पंचांगानुसार कार्तिक एकदशी तिथी 12 नोव्हेंबरला, मंगळवारी संध्याकाळी 6.42 मिनिटांपासून ते 13 नोव्हेंबर, बुधवारी संध्याकाळी 7.24 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल.
यंदा किती दिवस असेल सोहळा?
कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबपर्यंत तुळशी विवाह असणार आहे.
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.29 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7.53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
तुळशी विवाहाला काय लागतं साहित्य?
तुळशी विवाहाला काय साहित्य लागते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने तुळशी विवाहासाठी 4 ऊस, बोरं, चिंचा, नागवेलीची पानं, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुलं, बाळकृष्णाची मूर्ती, हळद -कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, आंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू (तांदुळ अक्षतांसाठी रंगीत), जानवे जोड, लाह्या आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
तुळशीसाठी सौभाग्य अलंकार
मणी-मंगळसूत्र, जोडवे -विरोदे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधू वरांना, हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामुग्री समिधा
तुळशी विवाहाची पूजा कशी मांडावी?
- तुळशीभोवती रांगोळी काढा. प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा.
- तुळशीसमोर पाटावर तांदुळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण आणि तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करावी.
- मंगलाष्टक म्हणण्या आधी पुण्याहवाचन विधी करावा. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरून, उपस्थितांना अक्षता वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी.
- अन्यथा घरातील पतीपत्नीनेही केले तरी चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी मंगळसूत्र ओटीचे आणि इतर साहित्य उपवर मुलगा वाहील. ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केला तरी चालतो.
तुळशी विवाहाची काय आहे आख्यायिका?
- पौराणिक कथांनुसार जालंधर नावाचा एक असुर होता. वृंदा नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला होता. वृंदा ही विष्णूची परमभक्त होती. वृंदाच्या पतिव्रत धर्मामुळे जालंधरला कोणीही मारू शकले नाही. जालंधरला आपल्या अजेयपणाचा अभिमान वाटू लागला आणि तो स्वर्गातील मुलींचा छळ करू लागला. त्याच्या दहशतीने त्रस्त झालेले देवी-देवता भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि जालंधरच्या कोपापासून त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागले.
- जालंधरची पत्नी वृंदा ही पतीप्रिय स्त्री होती आणि जालंधर पतिव्रत धर्माने अजेय होती, तिला कोणीही पराभूत करू शकले नाही. त्यामुळे जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रत धर्म भंग करणे आवश्यक होते. याच कारणास्तव विष्णूने आपल्या मायेने जालंधरचे रूप धारण केले आणि फसवणुकीने वृंदाचा पतिव्रत धर्म नष्ट केला. यामुळे जालंधरची सत्ता संपुष्टात आली आणि युद्धात त्याचा पराभव झाला.
- वृंदाला ही फसवणूक लक्षात येताच ती संतापली आणि तिने विष्णूला शिळा होण्याचा शाप दिला. त्यानंतर वृंदा स्वतः सती बनली. सती गेल्यानंतर जिथे वृंदा भस्म झाली, तिथे तुळशीचं झाड उगवलं. देवतांच्या प्रार्थनेने वृंदाने आपला शाप मागे घेतला, परंतु विष्णूने वृंदाला केलेल्या फसवणुकीचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे वृंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी भगवान विष्णूने दगडी रूपात आपले रूप प्रकट केले. त्या रुपालाच शाळिग्राम म्हटले जाते.
( डिस्क्लेमनर- सदर माहिती आम्ही वाचकांसाठी देत आहोत, यातील काही आख्यायिका तसेच पद्धतीचे वनइंडिया मराठी समर्थन करत नाही)












Click it and Unblock the Notifications