मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत महारस्सीखेच
मुंबई: मुख्यमंत्रीपदावरून 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडले. शिवसेना भाजप युती तुटली आणि शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी महाविकास आघाडी जन्माला आली. त्याच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून आणखी वाद झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 8 मंत्री आणि 40 आमदार वेगळे झाले.

शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. आता लोकसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु झालं आहे.
संजय राऊत यांनी दामटले उद्धव ठाकरे यांचं नाव
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव दामटलय. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, अन्यथा निवडणूक लढणे कठीण जाईल, अशी घोषणाच संजय राउत यांनी करून टाकली. त्यामुळे महा विकास आघाडीत एका नव्या चर्चेला उधाण आलंय. आघाडीतील अन्य पक्ष या घोषणेला कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.
जयंत पाटील यांची सावध भूमिका
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्यांपैकी एक आहेत. अनेक मंत्रिपदे त्यांनी भूषविली आहेत. महाविकास आघाडीने एकदिलाने निवडणुका लढाव्यात, मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरू नये. राज्यासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. देशावर मोठे कर्ज आहे. त्याविरोधात लढा देणे आवश्यक आहे. सर्वांनी एकदिलाने राज्यात सत्ता आणणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी नुकतीच मांडली होती. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला एकप्रकारे त्यांनी बगल दिली होती.
कॉंग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ चेहरे प्रतीक्षेत
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वजन चांगलेच वाढले आहे. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार अशी ज्येष्ठ मंडळी कॉंग्रेस पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष संजय राऊत यांच्या मागणीकडे कोणत्या नजरेतून पाहतो, हे देखील औत्सुक्याच ठरणार आहे.
शरद पवार यांचा शब्दच ठरणार निर्णायक ?
महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार यांचा शब्दच निर्णायक ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असताना त्यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव सुचविले होते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द बाळासाहेबांना दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता. आता कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीतही कॉंग्रेस हाच मोठा पक्ष आहे.उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची विधानसभेतील ताकद अजून सिद्ध झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा हा भोवरा किती आणि कसा फिरतो, ते लवकरच दिसून येणार आहे.












Click it and Unblock the Notifications