मुद्दे आणि गुद्दे..! वाचा, भाजपच्या शिर्डीतील अधिवेशनातील प्रमुख नेत्यांचा घाणाघात
भाजपचे महाअधिवेशन आज शिर्डीत झाले. या महाअधिवेशनाला भाजपचे राज्यभरातील सुमारे दीड हजार प्रमुख कार्यकर्ते व सगळे नेते उपस्थित होते. 'श्रद्धा, सबुरी अन् भाजपची महाभरारी' अशा टॅगलाईनखाली झालेल्या या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आशिष शेलार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच नेत्यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे आपण पाहू...

जे राहिलंय ते करु : गडकरी
आपल्या भाषणात मंत्री नितीन गडकरी यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडणुकीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विदर्भातून निवडणूक लढले होते. तेव्हा काँग्रेसने त्यांना पराभूत केले. मात्र पराभूत करणारा लोकांच्या लक्षात राहिला नाही. परंतु डॉ. आंबेडकर आजही सर्व विश्वाच्या लक्षात आहेत. तुम्ही जिंकले म्हणून कुणी लक्षात ठेवत नाही. तुम्ही काय केले, यावरुन तुम्ही लक्षात राहता. त्यामुळे आपल्याला काम करायचे आहे. जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला करता आले नाही, ते आपल्याला करुन दाखवायचंय.
फडणवीस अभिमन्यू : बावनकुळे
आपल्या भाषणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर प्रहार केला. ते म्हणाले, लोकसभेला विरोधकांनी खोटा प्रचार केला. त्याचा फटका आपल्याला बसला. मात्र विधानसभेला आपण ग्रामपंचायतीप्रमाणे पळालो. अमित शहांनी थेट महाराष्ट्रात येऊन आपल्याला विश्वास दिला. कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण जिंकलो. कार्यकर्त्यांमुळेच मला प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम करता आले. २०१९ ला आपल्यासोबत बेईमानी झाली. फडणवीसांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र फडणवीस अभिमन्यू निघाले. दगाफटका करणाऱ्यांचा महाराष्ट्रातील जनतेने परफेक्ट कार्यक्रम केला.
भावी घरी बसले : विखे
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, लोकसभेला ते खोटा प्रचार करुन जिंकले. मात्र विधानसभेला कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जिवावर आपण जाणते राजे, भावी मुख्यमंत्री या सर्वांना घरी बसवले. आता विधानसभेला मिळालेले यश आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम ठेवायचे आहे. आपल्याला भाजपला घराघरात पोहोचवायचे आहे. आपली लढाई अजूनही संपलेली नाही.
देवाभाऊ व्यक्ती नाही शक्ती : शेलार
आशिष शेलार म्हणाले, विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल म्हणत होते की, मोदींची हवा संपली. पण हवा कायम आहे, हे कार्यकर्त्यांनी विधानसभेला दाखवून दिले. उद्धव ठाकरेंचे ३१ जुलैचे भाषण मी कधीच विसरणार नाही. एकतर देवेंद्र राहिल किंवा मी राहील, असं ते म्हणाले होते. पण कोण राहिलं आणि कोण गेलं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. शरद पवारांच्या पक्षानेही ज्याची नाही त्याची मदत घेतली, पण हाती काहीच लागले नाही. सर्व पक्षांत ८८ टक्क्यांचा स्ट्राईक रेट देणारा आपला देवाभाऊ ही व्यक्ती नाही, तर शक्ती आहे.












Click it and Unblock the Notifications