दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवार नेमकं काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. याच दरम्यान आता शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच बैठकांमध्ये एकत्रित दिसून आले. एका कौटुंबिक सोहळ्यात पवार कुटुंब एकत्रित आल्याचे सर्वांनी पाहिलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी भविष्यात एकत्र यायचं की नाही हे नव्या नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही आम्ही विचाराने एकत्र आहोत. दिल्लीत असलेले आमचे खासदारही समविचारी आहेत.
राज्यात आमच्यासोबत असणाऱ्या काही आमदारांची भूमिका सुद्धा विकासकाम करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत जाण्याची आहे. मात्र याबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो नव्या पिढीने घ्यावा. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तरी आश्चर्य वाटणार नाही असेही पवारांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र याव की नाही याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून ठरवायला हवं. आज काही लोकं दुसऱ्या गटात असले तरी आमची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही असे पवारांनी सांगितले. तसेच पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियाने घ्यायला हवा. दरम्यान, पक्षात एक प्रवाह अजित पवारांसोबत जाण्याच्या मताचा असला तरी दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही सांगायला शरद पवार विसरले नाही.












Click it and Unblock the Notifications