शरद पवार यांचा खुलासा, म्हणून सर्वपक्षीय बैठकीला गेलो नाही
पुणे : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका, सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी मारलेली दांडी, या दांडीमागे पवारांचा हात असल्याचा भुजबळांचा आरोप आणि त्यानंतर भुजबळ यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट हा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सविस्तर खुलासा केला.

जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त कार्यक्रम झाला म्हणजे त्यांच्यात संवाद होता. दुसरीकडे एकाने ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केलं, तेव्हा सरकारचं बोलणं झालं. त्यांच्यात आणि सरकारमध्ये काय बोलणं झालं याबद्दलचं वास्तव पुढे येत नाही, तोपर्यंत चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून बैठकीला गेलो नाही,' असा खुलासा शरद पवार यांनी केला.
जातीय वाद वाढायला या लोकांची वक्तव्यं कारणीभूत आहेत. राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्याची भूमिका घ्यायला हवी. मात्र ती किती घेतली हे माहीत नाही. आम्हा लोकांना बाजूला ठेऊन निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचं म्हणत मार्गदर्शन करा सांगतात, असा टोला पवारांनी भुजबळ यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशन काळात आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते बैठकीला येणार होते. पण बारामतीमधून एक फोन आला आणि नेत्यांनी दांडी मारली, अशा शब्दांत भुजबळांनी रविवारी बारामतीत झालेल्या जाहीर सभेतून पवारांना लक्ष्य केलं. त्यानंतर 24 तासातच भुजबळ मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांन आंधी भेटीची वेळ मिळाली नाही. एक तासानंतर पवार आणि भुजबळ यांच्यात चर्चा झाली होती.
अरे ती बारामती आहे....
लोकसभा निवडणुकीत झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या पराभवाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. बारामतीमध्ये आपण विकासकामे केल्याचे अजित पवार सांगत होते. भविष्यात केंद्रातून निधी आणण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले होते. मात्र बारामती मतदारसंघातच सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. यावर बोलताना शरद पवार यांनी "अरे ती बारामती आहे" अशा मिश्कील शब्दात उत्तर दिले. अजित पवार यांनी विकास केला तर त्यांना लोकांनी मते का दिली नाहीत, असा सवाल देखील त्यांनी केला.
विधान परिषद : कुणीच कुणाला फसवलं नाही
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कुणीच कुणाला फसवलेल नाही. रणनीती कशी असावी यात मतभिन्नता झाली, असे पवारांनी सांगितले. माझ्या मताप्रमाणे प्राधान्याची मते दिली असती तर जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता. मात्र माझे गणित सर्वांनाच मान्य होईल असे नाही, असेही पवार म्हणाले.












Click it and Unblock the Notifications