Sanjay Raut : पवार काका-पुतणे पुन्हा एकत्र, शिंदे भाजपचे मांडलिक'; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut big political claim : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नवनवीन भूकंप पाहायला मिळत आहेत. त्यातच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार हे प्रत्यक्षात एकत्रच आहेत आणि ते आगामी निवडणूक एकाच चिन्हावर लढवतील, असा दावा करत राऊतांनी महायुती आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे.

"महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरलाय"
राज्याचे राजकारण सध्या 'शिशारी' आणणारे झाले आहे, अशा शब्दांत राऊतांनी आपली अगतिकता व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही कालच्या भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले, "महाराष्ट्रात सध्या गुलामांचा बाजार भरलेला आहे. माणसाच्या विचारांना आणि जगण्याला काही किंमत उरलेली नाही. भ्रष्ट पैशाच्या जोरावर सर्व काही तोडले जात आहे."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी अत्यंत बोचरी टीका केली. "एकनाथ शिंदे हे भाजपचे मांडलिक राजे आहेत," असे म्हणत या गुलामीच्या राज्याचे खरे 'बादशाह' दिल्लीत बसले असून महाराष्ट्र ही गुलामी कधीही पत्करणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?
संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा पवार कुटुंबातील संबंधांवर होता. अजित पवार सध्या महायुतीत असले तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबत 'पाट' लावलेला आहे, असे राऊत म्हणाले. "शरद पवार आणि अजित पवार हे जवळजवळ एकत्र झाल्यासारखेच आहेत. माझ्या माहितीनुसार, ते एकाच चिन्हावर (घड्याळ) निवडणूक लढवणार आहेत," असा दावा राऊतांनी केला. अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडावेच लागेल, कारण दोन दगडांवर पाय ठेवून प्रवास करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. भविष्यात अजित पवार महाविकास आघाडीत दिसतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
"मेलं मेंढरू आगीला भीत नाही"
सिंचन घोटाळ्यावरून भाजप वारंवार अजित पवारांना लक्ष्य करत असल्याच्या प्रश्नावर राऊतांनी "मेलं मेंढरू आगीला भीत नाही" या म्हणीचा वापर करत भाजपची खिल्ली उडवली. "पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि नंतर त्याच नेत्यांना सरकारमध्ये सामील करून घेतले. मग आता कोणत्या तोंडाने आरोप करताय?" असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. भाजपनेच त्यांना क्लीनचिट दिली आहे, तर मग आताच्या आरोपांमध्ये काय तथ्य उरले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भुजबळ प्रकरणावरून तपास यंत्रणांना टोला
छगन भुजबळ प्रकरणावर बोलताना राऊतांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भुजबळ अडीच वर्षे तुरुंगात राहिले आणि शेवटी सर्व प्रकरणांत निर्दोष सुटले. याबद्दल गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित्त घ्यायला हवे, असे ते म्हणाले. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत अनेक नेते सत्तेच्या भीतीने त्यांच्यासोबत आहेत; मात्र सत्ता बदलताच हे सर्व नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे वळतील, असा दावाही त्यांनी केला.
सोलापूरच्या 'युती'वर सावध पवित्रा
सोलापूरमध्ये दोन शिवसेना एकत्रित लढत असल्याच्या चर्चांवर राऊतांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. जोपर्यंत ते स्वतः उद्धव ठाकरेशी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत या विषयावर अधिक भाष्य करणार नसल्याचे सांगत त्यांनी हा प्रश्न निकालात काढला.












Click it and Unblock the Notifications