महाराष्ट्राच्या राजकारणातील 'रणरागिणी' हरपली; माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Shalinitai Patil Passes Away : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने आणि स्पष्टवक्तेपणाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईतील माहिम येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय क्षितिजावरील एक वादळी आणि संघर्षाची गाथा असलेला अध्याय संपुष्टात आला आहे.

अखेरची झुंज संपली!
गेल्या काही महिन्यांपासून शालिनीताई पाटील आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत होते आणि माहिम येथील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
'राजकारणातील वाघीण' अशी ओळख!
शालिनीताई पाटील या त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण' असा केला होता.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत्या, मात्र स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते; उदयनराजे त्यांना मातेसमान मानत असत.
राजकीय प्रवास आणि मंत्रिपद!
शालिनीताईंचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
संसदीय कारकीर्द: त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार होत्या.
मंत्रिपद : बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले होते. मात्र, त्यांच्या रोखठोक स्वभाव आणि भूमिकेमुळे तत्कालीन सरकारमध्ये मोठे वादंगही निर्माण झाले होते.
पक्षीय वाटचाल : काँग्रेसमधून कारकीर्द सुरू करणाऱ्या ताईंनी मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षाच्या धोरणांवर टीका केल्याने २००६ मध्ये शरद पवारांनी त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी 'क्रांतीसेना महाराष्ट्र' हा स्वतःचा पक्ष स्थापन केला, पण कालांतराने त्या पुन्हा काँग्रेसवासी झाल्या.
मराठा आरक्षण आणि समाजकार्य
शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वात आधी आवाज उठवणाऱ्या नेत्यांपैकी एक होत्या. त्यांनी नेहमीच आर्थिक निकषावर आरक्षणाची पाठराखण केली.
समाजकार्यातही त्या मागे नव्हत्या; १९७० च्या दशकात त्यांनी गरीब रुग्ण आणि महिलांच्या मदतीसाठी 'राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान' ची स्थापना केली होती.
'खंजीर' खुपसल्याचा तो सल...
2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा शालिनीताईंनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते, तो प्रसंग आठवून त्या म्हणाल्या होत्या की, "वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर काय वेदना होतात, हे आता पुतण्याने बंडखोरी केल्यावर पवारांना नक्कीच समजले असेल."
वैयक्तिक जीवन आणि संघर्ष
शालिनीताईंचा जीवनप्रवास संघर्षाने भरलेला होता. त्यांच्या पहिल्या पतीच्या (जे न्यायाधीश होते) निधनानंतर त्यांनी मंत्रालयात नोकरी केली. तिथे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पीए (खाजगी सचिव) म्हणून काम करताना त्यांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी विवाह केला. दादांच्या निधनानंतरही त्यांनी आपला राजकीय लढा जिद्दीने सुरू ठेवला.












Click it and Unblock the Notifications