"आपल्यानंतर काहीच उभं राहू नये" संजय शिरसाटांचा मुख्यमंत्र्यांना टोला, फडणवीसांचं उत्तरही ठसठशीत
राज्यातील महायुतीतील पक्षांमध्ये श्रेयवादावरून नेहमीच तणावाची परिस्थिती पाहायला मिळते. संधी मिळताच एकमेकांना टोले मारण्याची संधी कोणीही सोडत नाही. अशाच एका प्रसंगाचं साक्षात्कार शनिवारी नागपुरात पाहायला मिळालं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत नागपूर विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हलक्याफुलक्या शैलीत पण टोचणारा विनोद करत निशाणा साधला.

"तुमच्या नंतर काही उभं राहू नये?" शिरसाटांचा खोचक प्रश्न
कार्यक्रमाच्या आधी फडणवीस, शिरसाट आणि इतर मान्यवर नेते विधी महाविद्यालयातील एका खोलीत बसले होते. त्यावेळी झालेल्या संवादाचा उल्लेख करत शिरसाट म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणाले की ही खोली पाडणार आहोत. मग मी मनात विचार केला की, यांचा हेतू असा आहे का की आपल्यानंतर दुसरं काही उभंच राहू नये?"
त्यांच्या या विनोदी टोलेबाजीने सभागृहात हशा पिकला, पण त्यामागे असलेला राजकीय उपरोध स्पष्ट जाणवत होता.
मुख्यमंत्र्यांचं उत्तर : "हे अर्धसत्य आहे"
यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. "संजय शिरसाट यांनी अर्धसत्य सांगितलं. ती खोली पाडण्यामागे कोणताही आकस नाही. महाविद्यालयासाठी नवीन आणि आधुनिक इमारत उभारण्याच्या उद्देशाने मी ते बोललो," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
"श्रेय कसं घ्यायचं, ते आज शिकायला मिळालं" - शिरसाटांचा दुसरा टोला
फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर शिरसाट पुन्हा एका मुद्द्यावर भाष्य करत म्हणाले, "या पार्कसाठी निधी माझ्या खात्याकडून देण्यात आला होता, पण कौतुक मात्र बावनकुळे यांचं केलं जात आहे. त्यामुळे इथे येऊन मला कळलं की श्रेय कसं घ्यायचं!"
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात श्रेयवादावरून सुरु असलेली स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
मुख्यमंत्री आणि गडकरी यांचं स्पष्टीकरण
संजय शिरसाट यांच्या निरीक्षणावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, संविधान उद्देशिका पार्कसाठी केवळ एका खात्याचा नव्हे, तर अनेक खात्यांचा निधी वापरण्यात आला आहे. त्यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दुजोरा दिला.
राजकीय गमती आणि सूचक टोले एकाच व्यासपीठावर
या संपूर्ण प्रसंगात स्पष्ट दिसून आलं की, महायुतीतील नेत्यांमध्ये जरी एकत्र सरकार चालवत असले, तरी अंतर्गत चिमटे आणि राजकीय स्पर्धा अजूनही कायम आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच पक्षांनी आपापली भूमिका मांडताना थोडीफार चेष्टामस्करी करत गंभीर संकेतही दिले.












Click it and Unblock the Notifications