संतोष देशमुखांसारखं माझ्याबाबतीतही... बंगल्याच्या रेकीनंतर संजय राऊतांनी व्यक्त केली ही शंका
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्याची मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांकडून रेकी करण्यात आली. राऊत यांच्या बंगल्याचे मोबाईलवर शुटींगही करण्यात आले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्याची जास्त चर्चा झाली. आता या प्रकरणावर संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत
या सगळ्या प्रकारानंतर खा. संजय राऊत यांनी तातडीने मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथून बाहेर आल्यावर त्यांना पत्रकारांनी रेकीच्या प्रकाराबाबत प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, "हे बघा माझ्याकडे त्याची माहिती आहे. 'सामना' कार्यालयाची रेकी होते. माझ्या घराची रेकी होते आणि दिल्लीतील घराचीदेखील रेकी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. ते आता रेकॉर्डवर आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलले आहेत. आता विधानसभेत भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे.", असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं.
संतोष देशमुखसारखं माझ्याबाबत...
आपली सुरक्षा काढून घेतली आहे, असं संजय राऊत यांना विचारल्यावर ते म्हणाले, "महायुती सरकारने माझी सुरक्षा काढून टाकली आहे. बघुया काय होतं ते, संतोष देशमुखसारखं काही लोकांना करायचं असेल, ते आपण बघू. या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही. काल कल्याणमध्ये ज्या पद्धतीने मराठी माणसांवर हल्ले झाले आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यापासून वारंवार घडताना दिसत आहे. भीती राहिलेली नाही. कुणाचाही कुठेही खून होईल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे", असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भांडुप येथील मैत्री बंगल्याची काही इसमांकडून आज सकाळी रेकी करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रेकी करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोबाईल कॅमेरे लावून रेकी करण्यात आल्याचादेखील धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी याबाबत पुरावे दाखवले आहेत. विधानसभेत ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात विषय मांडला आहे.












Click it and Unblock the Notifications