छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची मागणी
कोणताही ऐतिहासिक संदर्भ व पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी, अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

कुठे आहे वाघ्याची समाधी?
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. शिवभक्तांनी अनेकदा विरोध करत याआधी एकदा हा पुतळा हटवला होता. पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला. त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षणदेखील आहे. आता संभाजीराजेंनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून, ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटले आहे.
काय लिहिलेय पत्रात?
छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1183386619825157?ref=embed_post
महाराष्ट्राचे दुर्देव
पुढे छत्रपतींनी म्हटलं आहे की, समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे.
मागणी आत्ताच का?
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications