राजकारणात भूकंप..? समाजवादी पार्टी मविआतून बाहेर; अबू आझमींचा ठाकरे गटावर निशाणा
सध्या विधीमंडळाचे विशेष अधिवशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला धक्का बसला. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने त्यांची साथ सोडल्याचे दिसत आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मविआची साथ सोडण्याचे जाहीर केले. आझमी यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे.

दोन आमदारांनी सोडली साथ
विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी ही मविआसोबत होती. मात्र त्यात मविआचा दारुण पराभव झाला. मविआत असणाऱ्या पक्षातील समन्वयाचा अभाव हेच या पराभवाचे कारण असल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले. शिवाय शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा हातात घेतल्यानेही समाजवादी पार्टी नाराज झाली. त्यामुळे समाजवादी पार्टीचे शिवाजीनगर-मानखुर्दचे आमदार अबू आझमी व भिवंडी मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे दोघे मविआतून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मविआचं विधानसभेतील बळ दोनने कमी झालं आहे.
काय म्हणाले अबु आझमी?
या वृत्तवाहिनीशी बोलताना अबू आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाताना आघाडी म्हणून एकवाक्यता गरजेची असते. मात्र ती दिसली नाही. कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडणूक लढत असेल, तर त्याला आपला उमेदवार समजलं गेलं पाहिजे. मात्र तसं झालं नाही, असंही आझमी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या स्टेजवर प्रचारासाठी आले नाहीत. जागा वाटपावेळीही रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे गटाकडे बोट
अबू आझमी यांनी शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर ठाकरे गटाने आमचा हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे, असं सांगत अबू आझमी यांनी, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत राहायचं की नाही हे ठरवावं, असंही स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications