दादा, तुमची भेट होईल तेव्हाच शर्टचं बटण लावेन; विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर, सभागृह हेलावले!
Rohit Pawar emotional speech : महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर आज एक अत्यंत भावूक प्रसंग पाहायला मिळाला. राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले.
"अजितदादा नावाचा जादूगार संपूर्ण महाराष्ट्राला हसवत निघून गेला," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रोहित पवारांनी घेतलेल्या काही विदारक शपथांनी संपूर्ण सभागृह हेलावून गेले.

"ते शेवटचं बटण आता वर गेल्यावरच लावेन"
अजित पवार यांच्या शिस्तीच्या आणि मिश्कील स्वभावाच्या आठवणी सांगताना रोहित पवार म्हणाले की, दादा नेहमी मला माझ्या शर्टचे वरचे बटण लावण्यास सांगायचे. "दादा मला नेहमी म्हणायचे, रोहित तुझ्या शर्टचं वरचं बटण लावत जा. पण आज मी शब्द देतो, आजपासून 40-50 वर्षांनंतर जेव्हा माझी दादांशी वर (परलोकात) भेट होईल, तेव्हाच मी त्यांच्यासमोर हे बटण लावेन. तोपर्यंत हे बटण असंच उघडं असेल, कारण ते मला रोज दादांची आठवण करून देत राहील."
केस कापले आणि वजनाचा 'तो' सल्ला पाळला
रोहित पवारांनी आपल्या काकांशी झालेल्या शेवटच्या काही संवादांना उजाळा दिला. "दादा एकदा म्हणाले होते, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. ज्या दिवशी दादा गेले, त्याच दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी माझे केस कापले." "दादा नेहमी म्हणायचे, शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यांना शब्द देतो की, मी शारीरिक वजन कमी करून माझे राजकीय वजन नक्कीच वाढवेन."
दोषींना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
अजित पवार यांचा मृत्यू एका अपघातात झाला असून, त्याबाबत रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "दादांच्या अपघातासाठी जो कोणी दोषी असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
आरोपांचे डाग पुसून टाका : फडणवीसांना कळकळीची विनंती
अजित पवार यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना रोहित पवार कमालीचे भावूक झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक महत्त्वाचे आवाहन केले की, "दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला, पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे डाग उडवले गेले. एकही आरोप सिद्ध झाला नाही, उलट आरोप करणाऱ्यांनीच नंतर त्यांची प्रशंसा केली. "देवेंद्रजी, तुम्ही दादांचे जिवलग मित्र आहात. माझी विनंती आहे की, हे सर्व खोटे आरोप एका गाठोड्यात भरून समुद्रात फेकून द्या. तीच दादांना खरी आदरांजली ठरेल."












Click it and Unblock the Notifications