महाविकास आघाडीत पेच; ठाकरेंचा शिवसेनेसाठी आग्रह, तर पवारांच्या नावावर शशिकांत शिंदेंचे विधान!
Rajya Sabha Election 2026 Maharashtra : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठीची राजकीय रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुतीचे ६ उमेदवार सहज निवडून येतील, अशी स्थिती आहे. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून आता मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या एका जागेसाठी शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरेंचा 'शिवसेना' कार्डासाठी आग्रह
शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा दावा अधिक भक्कम केला आहे. मविआमध्ये सध्या शिवसेना (UBT) कडे २० आमदार आहेत, तर काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादी (शप) कडे १० आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली आहे. यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत मांडलेले प्रश्न आणि पक्षाची कामगिरी पाहता, ही जागा शिवसेनेनेच लढवावी, असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
शशिकांत शिंदेंचे सूचक विधान: 'पवारांचे नाव आल्यावर विषयच संपला'
दुसरीकडे, शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. शिंदे म्हणाले, "राज्यसभेसाठी जर शरद पवार यांचे नाव पुढे आले, तर त्यांच्यासमोर दुसरा कुणी उमेदवार उभा राहील किंवा कुणी दावा करेल असे मला वाटत नाही. मविआमध्ये पवारांचा सन्मान सर्वोच्च आहे. शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे लवकरच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असून, शरद पवार यांनीच ही जागा लढवावी, यासाठी विनंती करणार आहेत.
सुप्रिया सुळे यांचा 'युनिटी' मंत्र
खासदार सुप्रिया सुळे यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि आमदारांची इच्छा आहे की साहेबांनी (शरद पवार) पुन्हा एकदा राज्यसभेवर जावे. यासाठी मी संजय राऊत, अनिल देसाई आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा केली आहे. हा निर्णय एकमताने व्हावा, अशी आमची इच्छा आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मुंबईत विश्रांती घेत आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर ते स्वतः या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतील.
राज्यसभा निवडणुकीचे गणित (२०२६)
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.
विजेतेपदाचा कोटा: एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान ३७ मतांची गरज आहे.
मविआची स्थिती: मविआकडे एकत्रितपणे ४६ ते ४९ मते आहेत, ज्यामुळे ते एक जागा सहज जिंकू शकतात. मात्र, दुसरी जागा लढवण्याचे धाडस केल्यास मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.












Click it and Unblock the Notifications