हीच ती वेळ ! राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र मोर्चासाठी जोरदार मोर्चेबांधणी, फोन फिरले अन् बरचं काही...
शाळा सुरू होऊन काही काळ झाला असला, तरी 'पहिलीपासून हिंदी शिकवणे' या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. आता या मुद्यावरून ठाकरे बंधूंनी एकाच वेळी आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय चर्चा अधिकच गडद होत चालली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, तर ७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मराठी समन्वय समिती'कडून हिंदी सक्तीविरोधात एल्गार पुकारण्यात येणार आहे. या दोन्ही मोर्च्यांची वेळ आणि उद्देश जवळपास एकसारखाच असल्याने "ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?" हा प्रश्न सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरे आणि ठाकरे गटात चर्चा?
वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) मधील एका महत्त्वाच्या नेत्याशी मोर्च्याच्या तारखेवर चर्चा केली होती. सुरुवातीला ६ जुलैला मोर्चा आयोजित करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. परंतु केवळ दोन तासांनंतर त्यांनी तारीख बदलून तो मोर्चा ५ जुलै रोजी काढण्याचं जाहीर केलं. हा निर्णय ठाकरे गटाशी समन्वय साधूनच घेतला गेला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. याबाबतची अधिकृत माहिती संजय राऊत पत्रकार परिषदेत देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकाच मुद्द्यावर दोघांचा मोर्चा, एकत्र येणार का ठाकरे बंधू?
मनसे आणि ठाकरे गटाच्या हालचालींमुळे हे स्पष्ट होत आहे की, हिंदी सक्तीविरोधात दोघेही गंभीर आहेत. शिवाय, दोन वेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्र आंदोलन करण्यावर सध्या विचारमंथन सुरू असल्याचं सांगितलं जातं. ठाकरे बंधूंच्या संपर्कामुळेच ५ जुलै ही तारीख निश्चित झाली असल्याचा दावा काही वर्तुळातून केला जात आहे.
ठाकरे बंधूंचं ऐतिहासिक एकत्र येणं?
या पार्श्वभूमीवर, दोन्ही बंधू एकाच मोर्चात सहभागी होणार का? एकमेकांच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यात, "महाराष्ट्राचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत," असे ठामपणे सांगितले होते. त्यामुळे आता दोघेही हिंदी सक्तीविरोधात एकत्र रस्त्यावर उतरले, तर ते महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा टप्पा ठरू शकतो.
हिंदी सक्तीविरोधातील ही लढाई ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणेल का? की हे फक्त एक मुद्द्यावरचं तात्पुरतं एकत्र येणं ठरेल? हे आगामी दिवसात स्पष्ट होईल. मात्र इतकं निश्चित की, या लढ्याने महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.












Click it and Unblock the Notifications