भाजपचाच मुख्यमंत्री होईल, पण साथ मनसेची घ्यावी लागेल; महाराष्ट्रातील 'या'बड्या नेत्याचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणाचा मुख्यमंत्री होईल हे आत्ताच सांगण तसं कठीण होऊन बसले आहे. पण राज्यातील बड्या नेत्याने यावर भाष्य करुन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल असा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
सद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती निवडणुकीला सामोरं जात आहे. पण जागावाटपात भारतीय जनता पक्षाने मोठा भाऊ म्हणून भूमिका घेतली. जवळपास 140 पेक्षा जास्त ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केलेत, त्यातुलनेत अजित पवार यांची राष्ट्रवादी व शिंदेंची शिवसेना यांनी कमी जागांवर उमेदवार उभे केलेत. दरम्यान, निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री कोण होणार यावर कोणीही स्पष्ट बोलत नाही.परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री कोणाचा असेल त्यांनी स्पष्ट सांगत महायुतीतील मुख्यमंत्र्यांचा चेहराच समोर आणला.

काय म्हणाले राज ठाकरे?
एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2024 चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा केला. तर याशिवाय 2029 चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे. तर यंदाच्या निवडणुकीनंतर मनसेच्या पाठिंब्यावरच भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज यांनी म्हटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या या विधानाने जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात सद्या कशी आहे लढत?
विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मनसेनंही 100 पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले असून स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीतील निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
अमित ठाकरेंवर काय म्हणाले राज ठाकरे?
वृ्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत देखील भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार आहोत.
मी शिवसेना फोडली नाही
राज ठाकरे म्हणाले. मला वेळ लागला तरी चालेल. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. पण महाराष्ट्रावर आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications