पुणे टाइम्स मिररचा उपक्रम कौतुकास्पद; पोलिसांच्या अहर्निश सेवेचा राज्यपालांकडून सन्मान
पुणे : डोळ्यात तेल घालून जनतेची अहर्निश सेवा करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समुहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

ʻपुणे टाइम्स मिररʼ आयोजित 'बिग सॅल्युट - ऑनरिंग हिरोज इन खाकी' या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, लेक्सिकॉन ग्रुपचे प्रेसिडेंट पंकज शर्मा, व्हॉईस चेअरमन नीरज शर्मा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. वेदप्रकाश शर्मा, पुणे टाइम्स मिररच्या संचालक शीतल बियाणी, लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन सुखदेव शर्मा आदी उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले, आपले सण उत्सव निर्विघ्नपणे साजरे व्हावेत म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सातत्याने कार्यरत असतात. यानिमित्ताने समाजाने त्यांच्या कार्याची दखलच घेतली आहे. पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा सन्मानाचे आयोजन केल्याबद्दल लेक्सिकॉन समूहाचे अभिनंदन करून राज्यपाल वर्मा म्हणाले, पोलीस दल अहर्निश सेवारत असूनही त्यांच्या कामाची फारच क्वचित दखल घेतली जाते. आपल्या देशांतील, शहरांची लोकसंख्या लक्षात घेता पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या या अत्यंत कौतुकास्पद उपक्रमाचे भविष्यातही आयोजन करण्यात यावे.
आपल्या देशातील तरुण पिढीने पोलिसांचे काम नीट समजून घेतले पाहिजे. यासाठी विशेषतः शैक्षणिक संस्थेत असे कार्यक्रम होणे महत्वाचे आहे. राष्ट्र चालवणे ही सामुहिक जबाबदारी असून समाज आणि सरकार यांनी राष्ट्रगाड्याच्या दोन चाकांच्या बरोबरीने काम केले तर यश निश्चित मिळते, असेही ते म्हणाले.
राज्यपाल वर्मा म्हणाले, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची हाक दिली आहे. त्यादिशेने वाटचाल करत असताना आपल्या राष्ट्र उभारणीसाठी प्रेरक बातम्या कशा द्यावयाच्या याबाबतही आपल्या पत्रकारितेने विचार केला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात बदल घडत आहेत. पत्रकारिता, कला, विज्ञान, नागरी समाज, न्यायशास्त्र, छायाचित्रण आदी सर्व क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. जुन्या पिढीला बातम्या, दृष्टिकोन, मते आणि अफवा यामध्ये फरक करणे कठीण होत चालले आहे.
प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. हा स्तंभ मजबूत असला पाहिजे. चांगल्या पत्रकारितेची परिभाषा प्रामाणिकपणातून प्रतिबिंबीत होते आणि प्रामाणिकपणासाठी भीतीपासून मुक्ती आवश्यक असते, असेही ते म्हणाले. पत्रकारिता असो, तंत्रज्ञान असो किंवा विकास असो, चांगले आणि वाईट याचा निर्णय त्यामागील नैतिकतेवर अवलंबून असतो. पत्रकारितेचे मोजमापही त्याच निकषावर केले पाहिजे. माध्यमांनी दुर्बल घटकांचे प्रश्नही मांडले पाहिजेत, असे विचारही वर्मा यांनी व्यक्त केले.
लेक्सिकॉनच्या विद्यार्थ्यांचे असेही कौतुक
लेक्झिकॉनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांचा उल्लेख करून राज्यपाल वर्मा म्हणाले, आज ज्यांनी ही गीते सादर केली त्या तरुण कलाकारांचेही मला मनःपूर्वक आभार मानायचे आहेत. त्यांचा आवाज अत्यंत सुरेल आणि मनमोहक होता. त्यांनी खरोखरच अप्रतिम गायन केले. त्यांनी अनेक सुंदर गीते सादर केली. मला खात्री आहे की आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये संगीतासारख्या कलांनाही महत्त्व दिले जात असेल. कारण केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान हे पुरेसे ठरत नाही.
शाळांमध्ये जे शिकता ते तर अत्यंत महत्त्वाचे असतेच मात्र जसा फळा महत्त्वाचा आहे, तसेच गिटारही महत्त्वाची आहे. वर्गात मिळणारे शिक्षण निश्चितच महत्त्वाचे आहे मात्र वर्गाबाहेर जे शिकता तेही तितकेच महत्त्वाचे असते. आयुष्यातील अनेक कौशल्ये आपल्याला वर्गाबाहेरच शिकायला मिळतात-उदाहरणार्थ, कॉफी कशी बनवायची, नाती कशी जपायची, सांघिक भावनेने खेळ कसा खेळायचा. ही सर्व जीवनकौशल्ये आहेत. ती कोणत्याही पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत. हा अनुभवातून मिळणारा शिक्षणाचा प्रकार आहे, ज्याला आपण 'अनुभवाधारित शिक्षण' म्हणतो. म्हणूनच अशा शैक्षणिक संस्थांमध्ये येताना मला नेहमी आनंद वाटतो.
मला शैक्षणिक संस्थांविषयी विशेष जिव्हाळा आहे. कारण विकसित भारताची पायाभरणी इथेच होत असते. तो भारत माझ्यासारख्या लोकांनी घडवलेला नाही; तर आमच्यासारखे लोक हे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधूनच घडत असतात.
राज्यपालांनी सांगितली जुनी आठवण
यावेळी पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, मला एक जुनी आठवण सांगावीशी वाटते. खूप वर्षांपूर्वी आम्ही तरुण असतानाची. आज कदाचित कुणालाही त्यावर विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी आम्हीदेखील तरुण होतो. त्या काळात अटलजी देशाचे पंतप्रधान होते. ते एकदा गुवाहाटी येथे आमच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी एक छोटासा प्रसंग सांगितला. मी तो प्रसंग अनेकदा सांगतो, कारण त्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला आहे.
ही गोष्ट साधारण तीस वर्षांपूर्वीची आहे. अटलजी आम्हाला म्हणाले की, अमेरिकेतून एक नामांकित तरुण पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी आला होता. त्याने अटलजींना विचारले, "भारताचे भविष्य काय आहे? पुढील वीस-तीस वर्षांनंतर भारत कसा असेल?"
त्यावर अटलजींनी त्याला उत्तर दिले, "तुम्ही येथे का आलात? तुमचा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये गेले पाहिजे होते. कारण या तरुण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नेच उद्याच्या भारताची आणि जगाची वास्तविक दर्शन असते." आणि म्हणूनच मला अशा शैक्षणिक संस्थांमध्ये यायला खूप आवडते. येथे मला भविष्यातील भारत दिसतो-एक असा भारत जो अधिक सक्षम, अधिक भव्य आणि अधिक सामर्थ्यशाली होणारा आहे. कदाचित ते दिवस पाहण्यासाठी मी उपस्थित नसेनही पण त्या भविष्याची झलक मला आजच्या तरुणांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसते. सन २०४७ मध्ये भारत कसा असेल, याचे चित्र मला आजच्या युवकांच्या नजरेत दिसते. विकसित भारताकडे पाहण्याची हीच माझी दृष्टी आहे.












Click it and Unblock the Notifications